नवी मुंबईतील गावे व गावाशेजारी गेली आठ वर्षे अनधिकृत बांधकामांचे इमले उभे रहात असताना सिडको किंवा पालिका प्रशासन झोपले होते का असा सवाल करुन गरजेपोटी विकत घेतलेली ही घरे सिडकोने तोडण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा आज नवी मुंबईतील रिपब्लिकन सेनेच्या शाखेने दिला.
नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामे पालिका अधिकाऱ्यांच्या कृपार्शिवादाने उभी राहिली आहेत. ही बांधकामे उभी रहात असताना सिडकोने तात्काळ कारवाई केली असती तर ती उभी राहण्याचा प्रश्नच येत नाही पण त्यावेळी सिडको व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या हातमिळवणीतून ही बांधकामे निर्माण झाली आहेत. ही अनधिकृत बांधकामे तुटत नसल्याचे बघून गरजवंत नागरिकांनी ती विकत घेतली. त्यात त्यांचा दोष काय असा सवाल करुन ही बांधकामे तोडण्याचा प्रयत्न केल्यास तोडण्यास येणाऱ्या पथकांना जशास तसे उत्तर या घरांमधील रहिवाशी देतील असा इशारा रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ निकाळाजे व नवी मुंबई अध्यक्ष खाजामिया पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
नवी मुंबईत सध्या अशी वीस हजार अनधिकृत बांधकामे उभी असून प्रकल्पग्रस्तांची बांधकामे या नावाखाली ती कायम करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे पण ही बांधकामे मुंब्रा, मुंबई, येथील लॅण्डमाफियांनी प्रकल्पग्रस्तांना हाताशी धरुन केली आहेत. त्यामुळे सिडकोने या घरांवर कारवाई करण्याचा इशारा दिला असून दहा दिवसात घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.