करोनाची बाधा होऊन एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्यासाठी ५ पेक्षा जास्त लोक नकोत असे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. यासंबंधीचं एक पत्रकच जारी करण्यात आलं आहे. त्या पत्रकात हे आदेश देण्यात आले आहेत. आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या संबंधीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या २१० च्या वर गेली आहे. तर मुंबईत आज आणखी एका करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर हे आदेश काढण्यात आले आहेत.

काय म्हटलं आहे पत्रकात? 

करोनामुळे ज्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे, त्या व्यक्तीचा मृतदेह काही विशिष्ट प्रक्रिया करुन प्लास्टिक बॅगमध्ये बंद केला जाईल. त्यानंतरच तो अंत्यसंस्कारासाठी दिला जाईल.

अंत्यसंस्कारासाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी हजर असता कामा नये.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मृत रुग्णांपासून कुणालाही करोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे

आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या सहीने हे पत्रक काढण्यात आलं आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही २१० च्या वर गेली आहे. तर भारतात ही संख्या १ हजारच्या वर गेली आहे. करोनाचे वाढते रुग्ण हा चिंतेचा विषय झाला आहे. संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सोडल्या तर कोणतीही दुकानं सुरु नाहीत. महाराष्ट्र आणि पंजाब ही या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत आहे, तुम्ही घरी राहून आम्हाला सहकार्य करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार केलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी रविवारीही संवाद साधला. त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील लोकांनी संयम सोडू नये. लॉकडाउनच्या दरम्यान नियम मोडू नये. लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळावेत असं आवाहन केलं आहे. करोना विरोधातली लढाई आपल्याला जिंकायची आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.