भाजप-शिवसेना व भारिप युतीमध्ये मनसेचा समावेश झाला नाही तर सत्तेचे गणित जमणारच नाही असे नाही, पण मनसे आल्यास हे गणित सोपे होईल, असा दावा करून मनसेशी युती करण्याबाबत भाजप उत्सुक असल्याचे स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकवार दिले. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी युतीची तयारी सुरुच आहे. महायुतीमधील तीनही पक्षांची संमती असेल, तरच युतीमध्ये चौथ्याचा समावेश होईल, असेही फडणवीस यांनी  स्पष्ट केले.
नरेंद्र मोदींना निवडणूक प्रचारप्रमुख पद दिल्यावर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केलेली नाराजी, नितीशकुमार यांनी साथ सोडल्यानंतरची रालोआची स्थिती, गडकरी-मुंडे वादाच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश पातळीवरील नियुक्त्या आणि राज्यातील शिवसेना-भाजपचे नाते आदी अनेक मुद्दय़ांवर फडणवीस यांनी बुधवारी ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’च्या व्यासपीठावरून मुक्तचिंतन केले. आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रश्नांच्या गोलंदाजीला कधी सहजपणे तर कधी ठामपणे, सावधपणे तोंड देत फडणवीस यांनी काही प्रश्न टोलविले तर काही प्रश्नांचे सविस्तर विश्लेषणही केले. सेना-भाजप रिपाईं युतीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेच्या समावेशाच्या मुद्दय़ावर गेले काही महिने चर्चा सुरू आहे. युतीमध्ये मनसेचा समावेश का आवश्यक वाटतो, यावरही फडणवीस यांनी विस्तृत विवेचन केले. केवळ ३७ टक्के मते मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. राज्यातील ६३ टक्के जनतेची मते काँग्रेस आघाडीच्या विरोधात आहेत, हेही स्पष्ट झाले आहे. ही प्रतिकूल मते विरोधी पक्षांनी संघटित केल्यास भ्रष्टाचारी व अकार्यक्षम सरकार बदलता येईल, असे त्यांनी सांगितले. मनसेमुळे होणारी मतविभागणी टाळण्यासाठी केवळ युती हा एकमेव पर्याय नाही, अन्य पर्यायही उपलब्ध आहेत, असेही ते म्हणाले.
मनसे हा शिवसेनेतून बाहेर पडलेला पक्ष असून सुरुवातीला त्यांनी युतीची मते घेतली. शिवसेनेत असताना उध्दव आणि राज ठाकरे या दोघांशीही आमचे मैत्रीचे संबंध होते. राज ठाकरे सेनेबाहेर पडले, तरी हे संबंध एका दिवसात संपतील असे नाही. निवडणुकीतील मतांचे गणित शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, रिपब्लिकन नेते यांना समजावून सांगितले आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंतही योग्यप्रकारे पोचविले आहे. सर्वाची एकमेकांविषयी असलेली मते आणि भूमिका भाजपला आता कळून चुकल्या आहेत. खरे तर अजून वेळच आलेली नाही, असे सांगत, राजकीय गणित जमविणे किती अवघड असल्याचे संकेतही फडणवीस यांनी दिले.
( या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत रविवार २३ जूनच्या अंकात)

निवडक फडणवीस
* शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उणीव सतत जाणवत राहील
* नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात मतभेद होते, आणि राहतील, पण त्याचा सामूहिक निर्णयांवर परिणाम होत नाही.  अंतिमत ते स्वीकारलेच जातात.
* युतीच्या काही जागांमध्ये अदलाबदल होणार.
* भाजप हा कणा असलेला पक्ष. अंतर्गत बाबीत सहकारी पक्षांची ढवळाढवळ नको.