सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेताना आवश्यक तयारी केली नव्हती. त्यामुळे हा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल, अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते शनिवारी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णयाचे भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील, असे भाजपकडून सांगितले जाते. मात्र, भविष्यात नेमके काय चांगले घडणार, हे पंतप्रधान मोदी यांनाही सांगता आलेले नाही. सध्या देश कुठल्या दिशेने चालला आहे, हे कळेनासे झालेले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती बघता ही वाटचाल अराजकाच्या दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील उद्योगधंदे कायमचे बंद होण्याची भीती आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

सध्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांना आपण कुठल्या दिशेने चाललोय, हे कळेनासे झाले आहे. सरकार दररोज बँकेतून पैसे काढण्यासंदर्भात वेगवेगळ्या घोषणा आणि निर्णय जाहीर करत आहे. सरकारची तयारी नसतानाही एवढा मोठा निर्णय का घेतला गेला, असा सवाल यावेळी राज यांनी उपस्थित केला. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकार सांगते. मात्र, १२० कोटींच्या भारतात केवळ चार टक्केच लोक आयकर भरतात. देशातील बहुतांश व्यवहार हे रोख पद्धतीने चालतात. त्यामुळे या रोख चलनाला काळा पैसा म्हणता येणार नाही, असे राज यांनी स्पष्ट केले. तसेच जर सरकारकडे काळ्या पैसेधारकांची नावे असतील तर त्यांच्यावर धाडी का टाकण्यात आल्या नाहीत, गेल्या काही दिवसांत बँकेच्या रांगेत ज्या ४० माणसांचा मृत्यू झाला, त्यामध्ये एकही काळा पैसेवाला होता का, असे सवाल राज यांनी सरकारला विचारले. नोटाबंदीच्या निर्णयाची तयारी दहा महिन्यांपासून सुरू होती, असा दावा सरकार करते. मग तेव्हाच परिणामांचा विचार करून ठोस उपाययोजना का आखण्यात आल्या नाहीत? काळा पैसा रोखायचा मग २ हजाराची नोट कशाला आणली? घरात दोन उंदीर मिळाले तर अख्खं घर जाळणार का? हा निर्णय फसला तर देश अनेक वर्षे मागे जाईल, याचा विचार करण्यात आला होता का, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत अशी मागणीही यावेळी राज ठाकरे यांनी केली.

यावेळी राज यांनी नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीवरही टीकास्त्र सोडले. मोदींना सकाळी  गोव्यात भाषण देताना हुंदका येतो आणि संध्याकाळी तुम्ही सांगता पवारांचं बोट धरून राजकारणात आलो. मोदींच्या या वर्तनाची सांगड नेमकी कशाप्रकारे घालायची, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. निर्णयामुळे संघातील लोक, भाजपमधील लोक नाराज आहेत, असेही राज यांनी म्हटले.