‘मुंबई तुंबल्यास कोण जबाबदार’ यावरून शिवसेना-भाजपचे आरोपप्रत्यारोप

मुंबईतील नदी-नालेसफाईच्या कामाची ‘पोचपावती’ देणारा पावसाळा अद्याप सुरूही झालेला नसताना, या मुद्दय़ावरून पालिकेतील राजकारण तापू लागले आहे. यंदाच्या पावसाळय़ात मुंबई तुंबली तर, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी करताच ‘महापौरांनी भ्रष्ट कंत्राटदार आणि अभियंते यांना पाठिशी घालू नये’ असा पलटवार भाजपने केला आहे. दुसरीकडे, कुर्ला परिसरातील मिठी नदीलगतचा राडारोडा सहा वर्षे उचलला नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविकेने उपोषण केल्याने नालेसफाईच्या मुद्दय़ावर यंदा राजकीय राडा होण्याची चिन्हे आहेत.

सध्या शहरातील सर्व लहान मोठय़ा नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या नाल्यांच्या सफाईची दरवर्षी आयुक्त तसेच महापौरांकडून पाहणी केली जाते. बुधवारी आयुक्तांनी नालेसफाईचा दौरा काढला होता. त्यावेळी सफाईचे काम ५० टक्केही झाले नसल्याच्या कानपिचक्या महापौरांनी प्रशासनाला दिल्या. त्याचवेळी मेट्रोच्या कामांमुळे शहर तुंबले तर त्यासाठी पालिका जबाबदार राहणार नसल्याचेही ते म्हणाले. अनेक ठिकाणी नालेसफाईची कामे अधिक वेगाने करण्याची गरज महापौर महाडेश्वर यांनी व्यक्त केली. आणखी दहा दिवसांनी पुन्हा पाहणी दौरा आयोजित केला जाईल. तेव्हाही गाळ काढला नसल्याचे दिसून आल्यास नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

महापौरांनी नालेसफाईच्या मुद्दय़ावरून राज्य सरकार आणि एमएमआरडीए तसेच मेट्रो महामंडळाला लक्ष्य केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर पलटवार केला. २६ जुलै २००५च्या जलप्रलयानंतर शहरातील नाले रुंदीकरणाची तसेच उदंचन केंद्रांची कामे हाती घेण्यात आली. मात्र, यातील अनेक कामे आजपर्यंत रखडली आहेत. महापौरांनी याविषयी बोलायला हवे होते, असा टोला भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी लगावला. ‘भ्रष्ट अभियंते आणि कंत्राटदारांना पाठीशी घालण्यासाठी मेट्रोच्या कामांवर टीका करण्यात महापौरांनी धन्यता मानली. मुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते याची महापौरांना कल्पना आहे. त्यामुळेच महापौरांनी मेट्रोच्या कामांना टीकेचे लक्ष्य केले. मेट्रोच्या कामांकडे लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत,’ असेही ते म्हणाले.

शिवसेना आणि भाजपमध्ये अशी जुंपली असतानाच, कुर्ला परिसरात नालेसफाईच्या मुद्दय़ावरूनच स्थानिक नगरसेविकेने उपोषण सुरू केले. कुर्ला परिसरातील मिठी नदीलगतचा राडारोडा गेली सहा वर्ष उचलला गेला नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या. पालिका प्रशासनाकडे गेले वर्षभर पत्रव्यवहार करूनही कोणतीही पावले उचलली गेली नसल्याने उपोषणाला बसण्याची वेळ आली, असे डॉ. सईदा खान म्हणाल्या. दरम्यान, खान यांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर पालिकेने राडारोडा उचलण्याची जबाबदारी एमएमआरडीएची असल्याचा दावा पत्राद्वारे केला. ‘मिठी नदीलगत भिंत उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीएची होती. त्यामुळे राडारोडा उचलण्याचे कामही त्यांचेच होते. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने आता पालिका या कामासाठी कंत्राटदार नेमेल,’ असे पालिका अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

शहरात जागोजागी मेट्रोसाठी खोदकाम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याखालून जाणाऱ्या पर्जन्यजलवाहिन्याही उखडण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांना पर्यायी मार्ग देण्याची गरज आहे. हे मार्ग देण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची आहे. हे काम व्यवस्थित झाले नाही तसेच या कामांचा राडारोडा पडून राहिल्याने मुंबई तुंबली तर त्याची जबाबदारी राज्य सरकारवर राहील.

विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

२६ जुलै २००५ रोजी मेट्रोचे खोदकाम सुरू नव्हते. तरीही मुंबई जलमय झाली होती. त्यानंतरही पावसाळ्यात मुंबई जलमय झाली असून महापौरांना त्याचे विस्मरण झाले आहे. झपाटय़ाने सुरू असलेली मेट्रोची कामे डोळ्यात खुपू लागल्यामुळेच आरोप करण्यात येत आहेत.

मनोज कोटक, नगरसेवक, भाजप