मुंबईत नाईट लाईफ सुरु झाल्यास महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होईल तसेच निर्भयासारख्या शेकडो घटना घडतील, असे मत भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारसमोर ठेवला होता, त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र, याला भाजपाने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला असून त्यातच पुरोहित यांनी हे विधान केले आहे.

पुरोहित म्हणतात, “मुंबईमधील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्जना २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. जर मद्यपानाची ही संस्कृती प्रसिद्ध पावली तर मुंबईत महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढेल आणि शेकडो निर्भयासारख्या घटनाही घडतील. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी ही संस्कृती भारतासाठी योग्य आहे का? याचा विचार करावा.”

२६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वाव नाईट लाईफ सुरु होणार आहे. यासंदर्भात एक बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. या बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला संमती देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांचं हे स्वप्न होतं. त्यांनी ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली होती. त्यानुसार आता या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलं आहे असं म्हणता येईल. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरु राहू शकतात.

आणखी वाचा – 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर ‘नाईट लाईफ’

मुंबईत नाईट लाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार होतं तेव्हाच त्यांनी ही संकल्पना मांडली होती. मात्र, त्यावेळी याबाबत काही निर्णय झाला नाही. आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या संदर्भातला निर्णय प्रायोगिक तत्त्वार का होईना पण झाला आहे. त्यामुळे आता पुढे हा निर्णय कायम होणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

…तर भाजपाचा विरोध

मुंबईत हॉटेल्स, बार, पब चोवीस तास सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हॉटेल्स, पब चोवीस तास सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा याला कडाडून विरोध राहिल, अशी भुमिका भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मांडली होती.