News Flash

विनाकारण करोनाची चाचणी, एन ९५ मास्कची मागणी करु नका; आरोग्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

सॅनिटायझरऐवजी साबण वापरणेही योग्य

राज्यातील करोनाग्रस्तांचा आजार बळावलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी याची भीती बाळगू नये. तसेच विनाकारण या आजाराची चाचणी आणि एन ९५ मास्कची मागणीही करु नये. सॅनिटायझरऐवजी साबणाने हात स्वच्छ धुतले तरी याच्या धोक्यापासून दूर राहता येते, अशा महत्वपूर्ण सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केल्या आहेत. या आजारासंबंधी विविध बाबींवर टोपे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

टोपे म्हणाले, “राज्यातील तीन प्रयोगशाळांमध्ये सध्या करोना बाधितांच्या चाचण्या सुरु आहेत. दिवसेंदिवस संशयीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने या प्रयोगशाळांवर ताण आला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या चाचण्यांचे रिपोर्टही वेटिंगवर आहेत. त्यामुळेच लोकांनी गरज नसल्यास करोनाची चाचणी करण्याची मागणी करु नये. अतिबाधित देशांमधून जे आले आहेत त्यांची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्याच केवळ चाचण्या केल्या जात आहेत. त्याचबरोबर एन ९५ मास्कची मागणीही नागरिकांनी करु नये, कारण या मास्कची खरी गरज रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफलाच असते सर्वसामान्यांना नाही. त्याऐवजी स्वच्छ धुतलेल्या रुमालांचाही वापर नागरिक करु शकतात.” दरम्यान, या प्रयोग शाळांची संख्या वाढवण्याची मागणीही राज्य शासनाने केंद्र सरकारकडे केली असल्याचे यावेळी टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्याचे टोपे यांनी सांगितले. यावेळी त्यांना विविध प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या. यामध्ये स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसेजरची (एसओपीज) अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आहेत. त्याचबरोबर गर्दी टाळण्याचे आणि शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या आजारापासून बचावासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरु आहे. राज्यातील करोना बाधितांचा आकडा १२ वर गेला असून पुण्यात ९, मुंबईत २ आणि नागपूरमध्ये १ रुग्ण अद्याप आढळून आल्याचेही यावेळी टोपे यांनी सांगितले.

प्रेक्षकांविना सामने होणार असतील तरच आयपीएलला परवानगी – टोपे

प्रेक्षकांविना आयपीएलचे सामने होणार असतील तर हरकत नाही. मात्र, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन हे सामने पाहण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यासाठी आयपीएलच्या तिकीट विक्रीवरच बंदी घालण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 8:12 pm

Web Title: if no need then do not demand for n 95 mask and cause test health minister rajesh tope advice to people aau 85
Next Stories
1 दिल्लीत जाण्याची इच्छा नाही, मन रमत नाही-संजय काकडे
2 दहशतवादी संघटनेकडून मुंबई बाग आंदोलनाला फंडिंग, प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट
3 “चिकन खाल्ल्यानं करोना होतो…” ही अफवा पसरवणारे दोघे झाले ट्रॅक
Just Now!
X