28 January 2021

News Flash

“… तर भविष्यात राज्य सरकारला फक्त पगार व पेन्शन देण्याचं काम उरेल”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले

संग्रहीत छायाचित्र

वर्ष २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी असं मलाही वाटतं. परंतु, वेतन व पेन्शनवर होणारा १ लाख ५१ हजार ३६८ कोटी रुपयांचा खर्च लक्षात घेतला, तर भविष्यात राज्य सरकारला फक्त पगार आणि पेन्शन देणं एवढं एकच काम उरेल अशी भीती व्यक्त करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील गरिबांचे कल्याण व सर्वांगीण विकासासाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यास नकार दिला आहे.

राज्य शासनाच्या सेवेत २००५ नंतर आलेल्या कर्मचाऱ्यांना अंशदान सेवानिवृत्ती योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची मागणी काही विधान परिषद सदस्यांनी केली होती. त्यावर उत्तर देतांना अजित पवार यांनी राज्याची आर्थिक स्थितीच सभागृहात सादर केली. केंद्र व राज्याच्या माध्यमातून सद्यस्थितीस राज्यशासनाच्या तिजोरीत साधारणपणे ४ लाख कोटी जमा होतात. त्यापैकी १ लाख ५१ हजार कोटी रुपये केवळ वेतनावर खर्च होतात. भविष्यात येणारा सातवा, आठवा वेतन आयोगाचा भार लक्षात घेतला व जुनी पेन्शन योजना लागू केली, तर त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन देणं एवढं एकच काम राज्य सरकारला उरेल, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात शेतकऱ्याला आजच्या परिस्थितीत दरमहा पाच हजार रुपयेही मिळत नाहीत, त्यामुळे टोकाची भूमिका घेऊन तो आत्महत्या करतो, हे आपलं दुर्दैवं आहे. ही सामाजिक, आर्थिक दरी कमी झाली पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत. शिक्षकांचे प्रतिनिधी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. परंतु राज्यातील १३ कोटी जनतेचं हित बघणं हे माझं कर्तव्यं आहे. शासकीय तिजोरीतून वेतन घेणारे कर्मचारी व अनुदानावर चालणाऱ्या संस्था या २५ लाख लोकांकरीता सरकार चालवायचे की १३ कोटी जनतेसाठी सरकार चालवायचे याचा विचार करण्याची गरज असल्याचही अजित पवार यावेळी म्हणाले.

सरकार चालवताना राज्याच्या सर्वागीण विकासाचा विचार करावा लागतो. गरिबांच्या विकासासाठी योजना राबवाव्या लागतात. शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, विद्यार्थी, युवक अशा सर्व घटकांचा विचार करावा लागतो. २००५ नंतर सेवेत आलेल्यांच्या भविष्य निर्वाहासाठी आजच्या घडीला त्यांच्या पगारातून १० टक्के आणि सरकारकडून १४ टक्के अशी २४ टक्के रक्कम दरमहा वेगळी काढली जाते. यातून या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित करण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दिल्लीत केजरीवाल सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली असल्यास त्याचीही माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे देखील ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 8:04 pm

Web Title: if overall development is to be sustained then old pension scheme is impossible deputy chief minister msr 87
Next Stories
1 स्पर्शातूनच महिलेला समजलेला असतो पुरुषाचा हेतू- मुंबई हायकोर्ट
2 ‘मुंबईची भाषा हिंदी’चा वाद : ‘तारक मेहता’ मधील बापुजी म्हणतात, मला माफ करा !
3 महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांचा वचनभंग : फडणवीस
Just Now!
X