संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी अर्थात भिडेगुरूजींनी केले. या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात विरोधकांनी आवाज उठवल्यावर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप तपासून बघू त्यात त्यांचे बोलणे असंवैधानिक आढळले तर प्रसंगी त्यांच्यावर कारवाईही करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर विधानसभेतल्या निवेदनात त्यांनी ही माहिती दिली.

शनिवारी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या आणि वारकरी भाविकांचं पुणेकरांनी स्वागत केलं. तर श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे सालाबादप्रमाणे संचेती हॉस्पिटल पूल ते डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत स्वयंसेवकासह सहभागी झाले. त्यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात सर्व धारकऱ्यांना तासभर मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना भिडे यांनी, आपल्या समाजाला गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा श्रेष्ठ होता, असे वादग्रस्त विधान केले.

या वक्तव्याचा विरोधकांनी समाचार घेतला. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संभाजी भिडेंवर सरकारने कारवाई का केली नाही असे प्रश्न अधिवेशना दरम्यान उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे नेमके काय म्हटले ते ऐकू ते दोषी आढळले तर त्यांना शिक्षा होईल असे आश्वासन दिले आहे.