धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत खुद्द त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलंय तर मंत्री मुंडे यांनी तात्काळ राजीनामा देणं अपेक्षित आहे, असं मत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत माझ्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आमची ही एकत्रित भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरेकर म्हणाले, “धनंजय मुंडे प्रकरणी राष्ट्रवादीची पहिली भूमिका चाचपडणारी होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ती मांडली होती. परंतू आता शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जर हे प्रकरण गंभीर असेल आणि संबंधित महिलेनं मोठे आरोप केले आहेत तर त्याची सिद्धता होईलच. राजकारणात शेवटी नितीमुल्य आणि नैतिकतेला फार महत्व आहे.”

आणखी वाचा- धनंजय मुंडेंवरील कारवाईसंबंधी शरद पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

जेव्हा जेव्हा राज्यात अशा घटना घडल्या किंवा प्रसंग आले त्या त्या वेळी संबंधीत मंत्र्याकडून राजीनामा घेतल्याची अनेक उदाहरण आहेत. शिवशाही सरकार असतानाही काही मंत्र्यांवर आरोप झाले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे राजीनामे घेतले होते. म्हणून त्याचं बाळासाहेबांचे सुपुत्र जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे कारण आता शरद पवारांचीही भूमिका स्पष्ट झाली आहे, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

धनंजंय मुंडे यांनी या प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा, जर चौकशीत ते निर्देष असतील तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समावून घेतलं जाऊ शकतं, हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माझं एकत्रित मत आहे, भाजपाच्या भूमिकाबाबत असं स्पष्टीकरणंही यावेळी दरेकर यांनी दिलं.