चौकीदार चोर है या घोषणेने भाजपाला आणि पंतप्रधान मोदींना जेरीस आणले आहे. काँग्रेसने सातत्याने ही टीका केली आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपाने मै भी चौकीदार ही मोहीम सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही मोहीम सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर चौकीदार नरेंद्र मोदी असं नावही बदललं. त्यानंतर अनेक भाजपा नेत्यांनीही आपल्या नावापुढे चौकीदार असा उल्लेख केला. तर भाजपाचे आमदार राम कदम यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार असं लिहिलं. यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत असा चौकीदार असेल तर देशातल्या मुलींना पोलीस संरक्षण द्यावं लागेल असं उपरोधिक ट्विट केलं आहे.

काही महिन्यांपूर्वी दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजपा आमदार राम कदम यांनी मुली पळवण्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. याच मुद्द्याचा आधार घेत सचिन सावंत यांनी हे उत्तर दिलं आहे.

मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणू असं बेताल वक्तव्य भाजपा आमदार राम कदम यांनी केलं. ज्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. महिला आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. त्यानंतर राम कदम यांनी माफीनामा सादर केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात वारंवार मी देशाचा चौकीदार म्हणून काम करतो आहे असा उल्लेख केला. याचाच आधार घेत काँग्रेसने नीरव मोदी प्रकरण, राफेल प्रकरण यांचा आधार घेऊन चौकीदार चोर है ही मोहीमच सुरु केली. आता राम कदम यांनी ट्विटरवर स्वतःच्या नावापुढे चौकीदार लिहिल्याने सचिन सावंत यांनी एक उपरोधिक ट्विट करत असे चौकीदार असतील तर देशातल्या मुलींना पोलीस संरक्षण घ्यावे लागेल असे म्हटलं आहे. आता या टीकेला उत्तर काय दिलं जाणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.