एकतर राम मंदिर बांधा नाहीतर जाहीर करा की राम मंदिरचाही जुमला होता. तुमच्याकडून जर राम मंदिर बांधायला सुरुवात झाली नाही तर आम्ही ते बांधू, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती हल्लाबोल केला. दादर येथील शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आणि इथं विचारले तेच प्रश्न तिथं मोदींना विचारणार असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

राम मंदिर बांधणार असाल तर त्याचे काम लगेच सुरू करा, नाहीतर आम्ही राम मंदिर बांधू, हे सांगायला मी अयोध्येत येत आहे. माझ्या पहिल्या अयोध्या भेटीत राम मंदिराबाबत दिलेल्या आश्वासनांची आठवण तुम्हाला करून देईन आणि त्यानंतरही काही झाले नाही तर पुढची भेट राम मंदिराच्या निर्माणासाठी असेल. तमाम हिंदूंना घेऊन मी अयोध्येत येईन आणि राम मंदिराच्या पवित्र कार्यास प्रारंभ करेन. २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आणि इथं विचारले तेच प्रश्न तिथं मोदींना विचारणार, आम्ही तुमचे दुश्मन नाही पण तुम्ही जनतेच्या भावनेशी केळू नका. त्यांच्या आशेवर पाणी पडलंच तर त्याचा लाव्हा व्हायला आणि त्यात तुम्ही भस्म व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा उद्धव यांनी दिला. तसंच माझ्या देशाचा पंतप्रधान एकादाही अयोध्येत का गेला नाही असा बोचरा प्रश्न उद्धव यांनी यावेळी मोदींना केला. आपले पंतप्रधान जगभर फिरतात. त्यांच्यामुळे भूगोलात कधी पाहिले नाही ते देशही आम्हाला कळले, हे खरे असले तरी जगभर फिरणारे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एकदाही अयोध्येत का गेले नाहीत, हा आमचा प्रश्न आहे. बाजूच्या वाराणसीतून तुम्ही निवडून आलात तरी अयोध्येत मात्र कधी फिरकलात नाहीत. तुमच्याकडून जर राम मंदिर बांधायला सुरुवात झाली नाही तर आम्ही ते बांधू. राम मंदिर बांधायला छाती किती आहे ते नाही, मनगटात बळ किती आहे ते महत्त्वाचे आहे. राम मंदिर हासुद्धा एक जुमलाच होता, असे एकदाचे जाहीर करून टाका. आम्ही टीका सहन करतोय ती केवळ हिंदुत्वासाठी तुमचे चोचले पुरवण्यासाठी नाही, अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी केंद्र सरकारला सुनावलं.

आपल्याकडे सत्ता असतानाही काही करु शकत नाही याची खंत असल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. पाकिस्तानला आपण उत्तर का देऊ शकत नाही. पाकिस्तान अतिरेकी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत आम्ही क्रिकेटही खेळणार नाही असं सांगितलं मात्र त्याचं काय झाल? असे अनेक प्रश्न उद्धव यांनी यावेळी उपस्थित केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेत्यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. या मेळाव्याला शिवसैनिकांनी प्रचंड  गर्दी केली होती.