तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने सरकारनेही डिजिटल इंडिया सुरु केलं आहे. या डिजिटल इंडियात इंटरनेट फुकट मिळत आहे, त्यामुळे केबलही फुकट देण्याच्या घोषणा होताहेत. मात्र, त्यामुळे केबल व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जात अाहे. सुरुवातीला सेवा फुकट देऊन नंतर त्यावर चार्जेस आकारले जातात, ही फसवणूक आहे. जर तुम्हाला केबल फुकट द्यायचे असेल तर तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

मुंबईत केबल मालक संघटनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. जिओ फायबर सेवेविरोधात केबल मालक संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी जिओच्या या नव्या सेवेमुळे केबल व्यावसायात त्यांची मक्तेदारी निर्माण होत असून त्यामुळे आमच्या व्यावसायावर गदा येत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मुंबईतील केबल मालक संघटनांकडून रंगशारदा सभागृहात शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पंचवीस-तीस वर्ष कष्ट करुन बसवेलेला व्यवसाय एखाद्या घोषणेमुळे एकदम बंद होत असेल तर असं मी होऊ देणार नाही. ज्यांचे व्यावसाय घरादारात गेलेत त्यांची घर उद्वस्त करु नका, असे आवाहन त्यांनी जिओ फायबर या केबल सेवेचे मालक मुकेश अंबानी यांना उद्देशून केले आहे. केबल व्यावसायिकांशी चर्चा करुन त्यांच्या अटींवर विचार करुन मग आपली धोरणे ठरवा, तसेच त्यांनाही सोबत घेऊन जा असा सल्लाही त्यांनी अंबानी आणि सरकारला दिला.

सगळं फुकट देणं हे केवळ घोषणे पुरतं असतं कारण, आधी फुकट देऊन लोकांना आपल्याकडे वळवायच नंतर शुल्क आकारणी करायची. त्यामुळे सगळ्यांना आनंदात रहायचं असेल तर केबल चालकांचा पोटावर पाय देऊ नका त्यांना पुढे घेऊन जा, असे आवाहन त्यांनी केले.