करोना प्रतिबंधासाठी टाळेबंदी, अंतरनियम हेच सध्याचे परिणामकारक उपाय आहेत. टाळेबंदीचा निर्णय आवश्यक होता. टाळेबंदीला अपयश आले असे म्हणता येणार नाही. मात्र, त्यास अपेक्षित यश मिळाले नाही, असे प्रतिपादन राज्याच्या करोना विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सोमवारी केले.

‘लोकसत्ता’तर्फे  आयोजित ‘लोकसत्ता विश्लेषण’ या विशेष उपक्रमात डॉ. ओक यांनी ‘करोनाची सद्य:स्थिती आणि भविष्यकालीन उपाययोजना’ यावर भाष्य केले. राज्याचे करोना विशेष कृती दलाचे प्रमुख, करोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि स्वत: करोनातून बरे झालेले एक रुग्ण अशा अनेक भूमिकांमधून आलेले अनुभव त्यांनी उलगडले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि वरिष्ठ सहायक संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी डॉ. ओक यांच्याशी संवाद साधला.

डॉ. ओक म्हणाले, रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्यालाही या विषाणूचा संसर्ग झाल्याची जाणीव झाली. खोकला, कणकण ही लक्षणे दिसताच रुग्णालयात दाखल झालो. सिटीस्कॅ न पाहताच हा करोना आहे याची खात्री झाली. रेमडेसिविरचे पहिले इंजेक्शन मिळताच बरे वाटायला सुरुवात झाली. त्यानंतर मी लगेच काम सुरू केले ही चूक होती. संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दोन आठवडय़ांनी शरीर अधिक तीव्र प्रतिक्रिया म्हणजेच ‘सायटोकाइन स्टॉर्म’ दाखवते. मलाही हाच अनुभव आला. काही दिवसांतच पुन्हा खोकल्याची उबळ आणि श्वास घ्यायला त्रास सुरू झाला. म्हणून लगेचच मी अतिदक्षता विभागात दाखल झालो. तेथे सामान्य रुग्णासारखा ऑक्सिजन लावून झोपून राहाण्याचा अनुभव घेतला. आपण यातून बरे होऊ की नाही या विचाराने इतर सामान्य रुग्णांसारखेच मलाही घेरले. त्याही परिस्थितीतून बरा झालो. वैद्यकीय विश्व आणि मानवीय नातेसंबंध यांच्या समतोलाची गरज करोना रुग्ण असताना अधोरेखित झाली. मात्र, करोना हा अत्यंत नेभळट विषाणू असून तो जीव घेत नाही, त्या वेळी शरीरात असलेल्या इतर व्याधींमुळे निर्माण होणारी गुंतागुंत जीवघेणी ठरते या निष्कर्षांप्रत आलो, असे डॉ. ओक यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या करोना विशेष कृती समितीच्या कामाबाबतही डॉ. ओक यांनी या वेळी माहिती दिली. ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी के ला आणि जबाबदारी घेण्याविषयी विचारले. जबाबदारी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व शाखांचे तज्ज्ञ डॉक्टर विशेष कृती समितीमध्ये आहेत. कृती समितीतील डॉक्टरांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत डॉक्टरांसह पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत मार्गदर्शन के ले. लंडन मधील हाइड पार्क मध्ये उभारण्यात आलेली रुग्णालये पाहून फील्ड हॉस्पिटल्सची संकल्पना सुचली. त्यांच्याबरोबर दर सोमवारी बैठक घेऊन जागतिक स्तरावर चाललेले उपचार, वापरली जाणारी औषधे, होणारे संशोधन यांबाबत चर्चा आणि ऊहापोह होतो. त्यामुळे रुग्णांवर कसे उपचार करायचे याचे स्वरूप निश्चित झाल्याचे डॉ. ओक यांनी सांगितले.

डॉक्टरांवर विश्वास ठेवा

करोनाग्रस्त झाल्यावर फोर्टिसमध्ये उपचार घेताना काय उपचार द्यावेत, याबाबत आग्रही होतो. परंतु प्रकृती अधिक गंभीर झाल्यावर माझ्या लक्षात आले की उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर विश्वास अधिक गरजेचा आहे. करोनाच्या उपचाराचे मापदंड आता ठरलेले आहेत. त्यामुळे डॉक्टर देत असलेल्या उपचारांवर शंका व्यक्त करण्यापेक्षा किंवा उपचाराविषयी डॉक्टरांना सल्ले देऊन दबाव आणण्यापेक्षा त्यांच्यावर १०० टक्के विश्वास ठेवून उपचार घेतल्यास रुग्ण नक्कीच बरा होतो. तेव्हा डॉक्टरांना सहकार्य करा, असा सल्ला डॉ. ओक यांनी दिला.

क्षयरुग्णांप्रमाणे रजा देण्याची मागणी

मध्यम किंवा गंभीर प्रकृतीचे रुग्ण बरे झाले तरी करोना त्याच्या पाऊलखुणा मागे ठेवतो. शरीराच्या विविध भागांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन त्या भागावर परिणाम होण्याची शक्यता असते. लंग फायब्रोसिससारखे आजार होण्याची शक्यता असते. धाप लागते. शब्द उच्चारण्याच्या क्षमतेत बदल जाणवतो. अशा रुग्णांना बरे झाल्यानंतरही पुनर्तपासण्या, फिजिओथेरपी यावर अधिक भर द्यावा लागतो. अधिक विश्रांतीची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे क्षयरुग्णाप्रमाणे या रुग्णांनाही काही दिवसांची रजा देण्याचा प्रस्ताव डॉ. ओक यांनी सरकारपुढे मांडला आहे.

कुटुंबियांशी संवाद गरजेचा

डॉक्टर म्हणून इतकी वर्ष सेवा देताना आम्ही अनेकदा नातेवाईकांना अतिदक्षता विभागात भेटण्यास प्रतिबंध करत आलो. मी स्वत: अतिदक्षता विभागात खाटेवर एकटा पडून होतो त्यावेळी मला माझ्या कुटंबियांची प्रकर्षणाने आठवण येत होती. रुग्णाला या अवस्थेत कुटुंबियाचा आधार, संवाद किती महत्त्वाचा असतो, ही वैद्यकीय क्षेत्राची उणीव लक्षात आली. तेव्हा अशा रुग्णांना टॅब्लेट किंवा फोन अशा माध्यमांतून कुटुंबियांशी संवाद साधण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना कृतिदलाच्या माध्यमातून दिल्या आहेत.

करोनासाथीने समाजाला आरसा दाखविला

करोनासाथीत जीव पणाला लावून सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना समाजाने अक्षरश: वाळीत टाकल्याचे काही अनुभव आहेत. मी रुग्णालयातच राहत होतो. परंतु, जेव्हा कधी आईला किंवा कुटुंबियांना भेटायला घरी जायचो. तेव्हा इमारतीच्या लोकांच्या नजरेत डॉक्टर तुम्ही का आलात, अशी भावना स्पष्ट दिसत होती. भयामुळे आपला जीव वाचविणाऱ्यांविषयीची भावना दूर करून सकारात्मकता निर्माण करण्याची गरज आहे. करोनाच्या साथीने आयुष्यातील पोकळी जाणवून देत समाजमनाचा आरसा दाखविला असल्याचे मत डॉ. ओक यांनी स्पष्ट केले.

विमा संरक्षण महत्त्वाचे

अतिदक्षता विभागात दाखल झाल्यावर रोजचा खर्च सुमारे ३५ ते ५० हजार असतो. नियंत्रित दर असले तरीही हा खर्च अधिक असून सामान्याप्रमाणे मलाही त्याची धाकधूक होती. परंतु, विमा असल्याने फारशी झळ बसली नाही. आरोग्य विमा ही संकल्पना आपल्याकडे मर्यादित वर्गापर्यत पोहोचली आहे. त्यातही विम्याची व्याप्ती किती असावी याबाबतही साक्षरता होणे गरजेचे आहे. पाच लाखांचा विमा सध्या पुरेसा नाही, असे ही डॉ.ओक यांनी स्पष्ट केले.

सामूहिक प्रतिकार शक्ती हा योग्य पर्याय नाही

सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) ही करोना नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर नाही. साधारणपणे ७० ते ९० टक्के लोक करोनाबाधित झाल्यानंतर ही शक्ती येण्याची शक्यता आहे. त्यासाठी इतक्या लोकांना बाधित होऊ देणे हे शहाणपणाचे नाही. त्यामुळे अमेरिकेने जी चूक केली ती आपल्या देशाने केली नाही हे अधिक महत्त्वाचे. करोनाशी लढण्यासाठी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ देण्याचा पर्याय योग्य नसून सुरक्षित अंतर, मास्क इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हाच योग्य मार्ग आहे, असे डॉ. ओक यांनी अधोरेखित केले.

आरोग्याचा खर्च १० टक्क्यांपर्यंत नेणे आवश्यक

करोनाची साथ आल्यानंतर अपुरे मनुष्यबळ, खाटा, साधनसामुग्री अशा सर्वच पातळीवर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची कोलमडलेली स्थिती प्रकर्षणाने समोर आली. त्यामुळे आता तरी आरोग्यवरील खर्चात पुढील काही वर्षांत जीडीपीच्या १० टक्कय़ांपर्यत खर्च करणे आवश्यक असल्याचे मत सरकारला कळवले आहे, असे डॉ. ओक म्हणाले.

खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमधील बांध

सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांतही उत्तम सेवा देणारे डॉक्टर उपलब्ध असून खासगी आणि सरकारी असा भेदभाव न करता यांच्यात समन्वय साधून जोडणारा बांध निर्माण करणे गरेजेचे आहे. सुरूवातीच्या काळात गरज असल्याने खासगी रुग्णालयातील दर निश्चित करणे गरजेचे होते. परंतु, आता या रुग्णालयांवरही आर्थिक ताण वाढत आहे. तेव्हा ८० आणि २० टक्कय़ांचे गुणोत्तर हळूहळू बदलणे आवश्यक असल्याचे डॉ. ओक यांनी मांडले.

चाचण्यांची उपलब्धता महत्त्वाची

चाचण्या जितक्या जास्त तितक्या लवकर निदान करून करोना आटोक्यात आणणे शक्य आहे. धारावीतील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यामागे हेच महत्त्वाचे कारण आहे. पल्सऑक्सीमीटरचा वापर करत जोखमीच्या गटातील रुग्णांना वेगळे करत वेळेत उपचार दिल्याने संसर्ग प्रसार कमी होत गेला. आजही आपल्याकडे खूप कमी प्रमाणात चाचण्या होत असून यांचे प्रमाण वाढविण्यासाठी सुरूवातीपासून दल आग्रही राहिले आहे. चाचण्यांचे मोठे बॅनर लावत शक्य तितक्या ठिकाणी चाचण्यांची केंद्र सुरू करावीत. आधार कार्ड दाखवून चाचण्या होतील इतक्या सहजतने उपलब्ध असतील त्याचवेळी संसर्गाचा प्रसार थांबविणे शक्य आहे, असेही डॉ. ओक यांनी स्पष्ट केले.