टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर अद्यापही १० ते १२ टक्के वाहनचालकांनी टॅग लावलेला नाही. त्यामुळे या वाहनचालकांकडून दुप्पट टोलची वसुली करण्यात आली असून नागपूर आणि मुंबई विभागांतर्गत जवळपास ४७ लाख रुपये टोल दंडापोटी (दुप्पट) वसूल करण्यात आला आहे.

वाहनांची गर्दी टाळण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहनांसाठी ‘वन नेशन वन फास्टॅग’ धोरण १६ फेब्रुवारीपासून अनिवार्य केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत रस्त्यांवरील टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा आटोक्यात आणण्यासाठी फास्टॅग यंत्रणा अनिवार्य करण्यात आली. १ जानेवारी २०२१ पासून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. अखेरीस १६ फेब्रुवारीपासून धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू झाली.

टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागेल, असे स्पष्ट करतानाच योजनेच्या अंमलबजावणीसाठी टोल नाक्यांवर मार्शलची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरही काही वाहनचालकांकडून अद्याप टॅग बसवण्यात आलेला नाही. बुधवारी (२४ फेब्रुवारी) रात्रीपर्यंत नागपूर विभागांतर्गत २६ लाख ४१ हजार रुपये, तर मुंबई विभागांतर्गत २१ लाखांपर्यंत दंड म्हणजेच दुप्पट रक्कम वसूल करण्यात आली आहे.

दंड झालेल्या वाहनचालकांमध्ये नागपूर, अमरावती, जळगाव, धुळे, नांदेड, पुणे ते सोलापूर भागातील अधिक चालक आहेत. मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या नाक्यांवर जवळपास १७ हजार वाहनांनी दुप्पट टोल भरला आहे. १७ फे ब्रुवारीला दुप्पट टोल भरणारी ३४ हजार ७१४ वाहने होती. परंतु सात दिवसांत त्यात घट झाली आहे.  नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या टोलनाक्यांवर २४ फे ब्रुवारीला १६ हजार ९५६ वाहनांनी टोल भरला असून त्यातही काही प्रमाणात घट होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अद्यापही दहा टक्के वाहनांना ‘टॅग’ नाही

* प्राधिकरणाच्या मुंबई विभागांतर्गत धुळ्यापर्यंत, पुणे ते सोलापूर, सोलापूर ते एडिशी, नाशिक ते पुणे व पुणे ते सातारापर्यंत २३ टोल नाके  आणि नागपूर विभागाच्या अखत्यारीत अमरावती, औरंगाबाद, जळगाव, धुळ्यातील काही भाग, नांदेड, नागपूर, यवतमाळमधील साधारण २५ टोलनाके  येतात.  सध्या ८८ ते ९० टक्के वाहनांना फास्टॅग लागला आहे.

* १५ फेब्रुवारीपर्यंत देशभरात फास्टॅग वापरकर्ते वाहनचालक २ कोटी ६० लाख होते. १६ फे ब्रुवारीपासून टॅग अनिवार्य करताच त्यात आणखी १५ लाखांहून अधिक वापरकर्त्यांची भर पडली आहे.