देशभरातील विद्यार्थ्यांची आयआयटीकडे असलेली ओढ लक्षात घेऊन आयआयटीमधील विविध अभ्यासक्रमांमधील प्रवेश क्षमता टप्प्या टप्प्याने वाढवून एक लाख विद्यार्थी एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही योजना राबविताना अनिवासी विद्यार्थी ही संकल्पना अवलंबिण्यात येणार आहे.
सध्या देशभरातील आयआयटीमध्ये पदवी, पदव्युत्तर तसेच पीएचडी अभ्यासक्रमांतील मिळून प्रवेश क्षमता ७२ हजार एवढी आहे. यात अभियांत्रिकीची प्रवेश क्षमता ९०८५ एवढी असून वेगवेळ्या अभ्यासक्रमांचे मिळून ७२ हजार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था आयआयटी कॅम्पसमध्येच करण्यात येत असली आगामी काळात ३० हजार प्रवेश क्षमता वाढविताना विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार नाही. दरवर्षी साधारणपणे १० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची योजना असून २०२०पर्यंत एकूण ३० हजार विद्यार्थ्यांना अनिवासी विद्यार्थी म्हणून प्रवेश देण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात २३ ऑगस्ट रोजी आयआयटी कौन्सिलच्या बैठकीत यावर र्सवकष विचार करण्यात आला. हे वाढीव प्रवेश देताना शिक्षणाच्या दर्जात कोणतीही तडजोड केली जाणार नसून अध्यापकांच्या उपलब्धतेचाही विचार या बैठकीत करण्यात आला असून वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अध्यापकांची पदेही लवकरच भरण्यात येणार आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयआयटींचा दर्जा वाढविण्याचा तसेच जागतिक क्रमवारीत आयआयटीचे स्थान उंचाविण्यावर भर दिला आहे. यासाठी देशातील सात प्रमुख आयआयटीसाठी ‘विश्वजीत’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या संस्थांचे रॅंकिंग वाढावे यासाठी विशेष साहाय्य करण्यात येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2016 1:55 am