करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने एक मोठा निर्णय घेतला आहे. डिसेंबरपर्यंत एकही ‘फेस-टू-फेस’ लेक्चर न घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून फक्त ऑनलाइन लेक्चर घेतले जाणार आहेत. वर्षअखेरपर्यंत सर्व प्रत्यक्ष लेक्चर स्थगित करण्याचा निर्णय घेणारी आयआयटी मुंबई देशातील पहिली प्रमुख शैक्षणिक संस्था ठरली आहे.

“पुढील सेमिस्टरचा अभ्यासक्रम फक्त ऑनलाइन पद्धतीने शिकवला जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही”, असे संस्थेचे डायरेक्टर सुभाशीष चौधरी यांनी सांगितलं. बुधवारी रात्री उशीरा याबाबत घोषणा करण्यात आली. “करोना महामारीने आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं द्यावं याचा पुनर्विचार करण्यास भाग पाडलं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात उशीरा होऊ नये यासाठी आम्ही व्यापक स्वरुपात ऑनलाइन क्लास घेण्याची योजना आखत आहोत”, अशी माहिती चौधरी यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. तसेच, “पैशांच्या कमतरतेमुळे एकाही विद्यार्थ्याचं शिक्षण बंद होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गरजू विद्यार्थ्यांसाठी आम्हाला जवळपास पाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे. अनेक माजी विद्यार्थी मदतीसाठी पुढे आले आहेत. पण तेवढी मदत गरजू विद्यार्थ्यांसाठी पुरेशी नाहीये, त्यामुळे शक्य तशी मदत करावी असं मी या पोस्टद्वारे आवाहन करतो”, असंही चौधरी यांनी नमूद केलं आहे.

या निर्णयामुळे संस्थेच्या 62 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात कॅंपसमध्ये एकाही विद्यार्थ्याची उपस्थिती नसताना होणार आहे. येत्या काळात अन्य आयआयटी संस्थाही अशाप्रकारचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे.