मुंबई : तंत्रज्ञान आणि कल्पकता यामुळे संशोधनासाठी नावाजल्या जाणाऱ्या मुंबई येथील इंडियन इन्स्टिटय़ू ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ओएनजीसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सौरचूल’ स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट सौरचूल बनविण्याचा सन्मान मिळवला आहे. यासाठी संस्थेला दहा लाख रुपयांचे पारितोषिकही मिळाले आहे.

खेडोपाडी दिसणारी धुरांडी आणि पारंपरिक चुलींऐवजी आरोग्य व पर्यावरणपूरक साधने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचव्यात या उद्देशाने ओनजीसीच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर ‘सौरचूल’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील सुमारे दीड हजार अर्जाची नोंदणी झाली होती. जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या छाननीमधून १३ अर्जाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रत्यक्ष प्रकल्पांची पाहणी करून सवरेत्कृष्ट प्रकल्प म्हणून मुंबईच्या आयआयटी संस्थेने सादर केलेल्या सौर चुलीची निवड करण्यात आली. या प्रकल्पांची छाननी आणि निवड प्रक्रिया अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने केली.

आयआयटीच्या चमूला प्रथम पारितोषिक म्हणून दहा लाख रुपयांचे बक्षीस देऊन पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते गौरविण्यात आले. बंगळूरुच्या बीएमएस महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक तर कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेला प्राप्त झाला आहे.