पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी मुंबईच्या नव्या प्रयोगाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. रविवारी आयआयटी मुंबईचा पदवीदान समारंभ पार पडला. करोनामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडल्याचे चित्र होते. ही निराशा दूर करण्यासाठी प्राध्यापक पराग चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या आभासी अवताराचा नवा प्रयोग केला. आभासी स्वरूपात स्वतचे पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या नव्या प्रयोगाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत कौतुक केलं आहे.

पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी मुंबईचं कौतुक तर केलंच शिवाय २०२० च्या या बॅचंला पास झाल्यामुळे शुभेच्छाही दिल्या. २०१८ मध्ये मी आयआयटी मुंबईला भेट दिली होती. तो क्षण पुन्हा आठवल्याचं सांगायलाही मोदी यावेळी विसरले नाहीत. पदवीदान समारंभासाठी आयआयटीचा परिसर आणि पदवीप्रदान समारंभाचे आभासी वातावरण तयार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे गप्पांचे ठिकाण, प्रयोगशाळा, वसतिगृहे अशी ठिकाणेही होतीच. शनिवार सायंकाळपासूनच विद्यार्थ्यांनी या आभासी कट्टय़ांवर हजेरी लावली. समारंभात विद्यार्थ्यांचे नाव पुकारले की त्या विद्यार्थ्यांचा ‘अवतार’ पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना दिसत होता.

आयआयटी मुंबईचा ५८वा पदवीप्रदान समारंभ रविवारी आभासी पद्धतीने पार पडला. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते प्रा. डंकन हॅल्डेन, ब्लॅकस्टोनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी स्टीफन श्वार्ट्समन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. शुभाशीष चौधरी यांनी वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. या समारंभात २४०४ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर, सामायिक पदवी, व्यवस्थापन पदव्युत्तर आणि पीएच.डी अशी विविध प्रमाणपत्रे देण्यात आली. यंदा १५१ विद्यार्थ्यांना पीएच.डी देण्यात आली. साहिल शहा या विद्यार्थ्यांने यंदाचे राष्ट्रपती पदक पटकावले.