परदेशी शिक्षण घेतलेल्या, उच्चशिक्षित आणि अनुभवी प्राध्यापकांचा शोध ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी)ला सातत्याने असतोच. देशात असे उच्चविद्याविभूषित उमेदवार मिळणे कठीण असते. यामुळेच की काय आयआयटीसारख्या संस्थांना अशा उच्चविद्याविभूषित भारतीयांचा शोध परदेशात घ्यावा लागत आहे.
आयआयटीमधून जो कुणी प्राध्यापक परदेशात व्याखानासाठी किंवा इतर कोणत्याही संशोधनाच्या कामासाठी जाईल त्याने तेथील भारतीय वंशाच्या उच्चविभूषित व्यक्तीला आयआयटीमधील संधींची ओळख करून द्यावी, असे सांगण्यात आले आहे. यामुळे आयआयटीमध्ये चांगल्या दर्जाचे प्राध्यापक येऊ शकतील आणि देशाची बुद्धिमत्ता भारतात परत येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
आयआयटीमध्ये अनेक विभागांमध्ये प्राध्यापक निवृत्तीनंतरही काम करतात. या प्राध्यापकांना ‘अ‍ॅडहॉक’, ‘संशोधन विभागाचे प्रमुख’, ‘व्हिजिटिंग प्राध्यापक’ आदी पदे देऊन कार्यरत ठेवले जाते. या प्राध्यापकांच्या अनुभवाचा आणि बुद्धीचा वापर देशातील विद्यार्थ्यांना व्हावा, हा या मागचा हेतू असल्याचे सांगण्यात येते. पण अनेक शाखांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे.  
आयआयटीत प्राध्यापकांना दरमहा काय मिळते?
सहाय्यक प्राध्यापक : १५६००-३९१०० रु. पगार व ८००० रु. शैक्षणिक श्रेणी वेतन.
सह प्राध्यापक : ३७४००-६७००० रु. पगार व ९५०० रु. शैक्षणिक श्रेणी वेतन
प्राध्यापक : ३७४००-६७००० रु. पगार व १०,५०० रु. शैक्षणिक श्रेणी वेतन.
*परदेशातील उमेदवाराची निवड झाली तर त्याला १ लाख रुपये स्थलांतरीत भत्ता.
*५० हजार रुपयांपर्यंतचा विमान प्रवासाचा भत्ता.
*तरुण प्राध्यापकास एक लाख रुपये सन्मानपूर्वक भत्ता.
*ढोबळमानाने प्राध्यापकास विविध भत्ते आणि वेतन मिळून एकूण सुमारे
दोन लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न.