आपल्या सर्वाचा तंत्रसोबती म्हणून ओळख बनलेला मोबाइल दिवसागणिक अधिक आपलासा होऊ लागला आहे. आपल्याला येणाऱ्या प्रत्येक अडचणीचे उत्तर या मोबाइलमध्ये मिळू लागले आहे. यामुळेच आज देशात वीज नसलेल्या गावांमध्येही मोबाइल पोहोचला आहे आणि पर्यायाने मोबाइलमधील स्मार्ट सुविधाही. सध्या सुरू असलेल्या चलनकल्लोळामध्येही मोबाइलने अनेकांना साथ देत त्यांचे व्यवहार सुरळीत करून दिले. हाच मोबाइल ज्या ऑपरेटिंग प्रणालीवर चालतो ती ऑपरेटिंग प्रणाली इंग्रजीधारित असल्यामुळे आजपर्यंत अनेक जण स्मार्टफोन वापरण्यास धजावत नव्हते. पण आता ‘इंडस’ या भारतीय ऑपरेटिंग प्रणालीने मात्र ती समस्या दूर केली आहे. यामुळेच केवळ मातृभाषा येणाऱ्यांच्या हातातही स्मार्टफोन दिसू लागले आहेत.

[jwplayer PuSvtqP8]

आयआयटी मुंबईतून अभियांत्रिकी पदवीधर झालेल्या राकेश देशमुखने इतर आयआयटीयन्सप्रमाणे सुरुवातीच्या काळात नोकरी स्वीकारली. दोन वष्रे नोकरी केल्यानंतर स्वत:चे काही तरी असायला हवे हा विचार असलेल्या राकेशने फर्स्टटच नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून अ‍ॅप विकसित करण्याचे काम केले जायचे. २००८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या कंपनीला देशातूनच नव्हे तर परदेशातून कामे मिळू लागली होती. हे काम सुरू असतानाच कंपनीच्या म्यानमार येथील एका ग्राहकाने त्यांना तेथील भाषेत ऑपरेटिंग प्रणाली विकसित करून मिळेल का, असा प्रश्न विचारला. त्या वेळेस राकेशने तातडीने होकार देत ते आव्हान स्वीकारले. राकेश आणि त्याच्या कंपनीने म्यानमारच्या कंपनीने दिलेले काम पूर्ण केले आणि त्यांना त्यांच्या भाषेतील ऑपरेटिंग प्रणाली उपलब्ध करून दिली. तेथे त्यांच्या या कामाचे खूप कौतुक झाले. मग हेच काम आपण भारतात का नाही करू शकत, असा प्रश्न राकेश आणि त्याच्या सहकाऱ्यांना पडला आणि त्यांनी त्यानुसार काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी गुजराती भाषेत ऑपरेटिंग प्रणाली विकसित केली. ही ऑपरेटिंग प्रणाली अ‍ॅण्ड्रॉइडला पूरक अशी होती.

ऑपरेटिंग प्रणाली ग्राहकांना कशी वाटते हे जाणून घेण्यासाठी त्यांची ऑपरेटिंग प्रणाली असलेले चार हजार मोबाइलचे उत्पादन केले. ते मोबाइल विक्रीसाठी दुकानात ठेवले. अल्पावधीतच त्याची विक्री झाली आणि ग्राहकांकडून तसेच विक्रेत्यांकडून त्यांनी त्याच्या उपयुक्ततेबाबत जाणून घेतले. तेव्हा सर्वाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने राकेश व त्याच्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढला व त्यांनी अन्य भारतीय भाषांमध्ये ही ऑपरेटिंग प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी फर्स्टटच या कंपनीचे ‘इंडस ओएस’ असे नामकरण करण्यात आले.

आज ही ऑपरेटिंग प्रणाली मराठीसह बारा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून नुकतेच या ऑपरेटिंग प्रणालीने देशात अ‍ॅण्ड्रॉइडनंतर सर्वाधिक वापरली जाणारी ऑपरेटिंग प्रणाली म्हणून दुसऱ्या स्थानावर नाव कोरले आहे. हे करत असताना त्यांनी अ‍ॅपलच्या आयओएसलाही मागे टाकले आहे.

अ‍ॅण्ड्रॉइड या लोकप्रिय मोबाइल ऑपरेटिंग प्रणालीला स्पर्धा असणाऱ्या आयओएससारख्या अन्य ऑपरेटिंग प्रणाली बाजारात आहेत. त्यांच्याच जोडीला आता इंडस ऑपरेटिंग प्रणालीचे नाव घेतले जात आहे. या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये मोबाइलची फारशी सवय नसलेल्या वापरकर्त्यांला डोळ्यासमोर ठेवून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

यातील अनेक सुविधा या आपल्या फीचर फोनसारख्यात आहेत. यामुळे वापरकर्त्यांला ही ऑपरेटिंग प्रणाली वापरताना कोणतीही अडचण जाणवत नाही. याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ही ऑपरेटिंग प्रणाली वापरण्यासाठी ई-मेल आयडीची गरज भासत नाही. आज अ‍ॅण्ड्रॉइड किंवा आयओएससारख्या ऑपरेटिंग प्रणाली वापरण्यासाठी आपल्याला ई-मेल आयडी असणे आवश्यक असते. यामुळे स्मार्टफोन न वापरणाऱ्यांची सर्वात मोठी अडचण दूर झाली. यानंतर ही ऑपरेटिंग प्रणाली असलेल्या फोनमध्ये आपण अ‍ॅप स्क्रीन सुरू केली तरी खाली फोन, लघुसंदेश याचे आयकॉन कायम असतात. जेणेकरून आपल्याला अ‍ॅप पाहात असतानाच फोन करावयाचा असेल तर होम स्क्रीनवर न जाता ते करणे शक्य होते. या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये दूरध्वनी क्रमांक सेव्ह करण्याची प्रक्रियाही अगदी सोपी असून ती केवळ दोन चौकटींमध्येच पूर्ण होते.

याचबरोबर आणखी एक वैशिष्टय़  नमूद करता येईल ते म्हणजे आपल्याला आलेला इंग्रजीतील लघुसंदेश आपल्याला वाचता येत नसेल तर तो एका क्लिकवर आपण निवडलेल्या भाषेत अनुवादित होऊन आपल्यासमोर येतो. म्हणजे आपण आपल्या भाषेत लघुसंदेश वाचू शकतो. तसेच आपण आपल्या भाषेत टंकित केलेला लघुसंदेश एका क्लिकवर इंग्रजीत होणे शक्य होते. कंपनीचे स्वत:चे अ‍ॅप स्टोअर असून त्यामध्ये उपलब्ध अ‍ॅपचा तपशील आपण निवडलेल्या भाषेत येत असल्यामुळे ग्राहकांना अ‍ॅपमध्ये नेमके काय आहे हे समजणे शक्य होते. अशा अनेक उपयुक्त सुविधांमुळे ही ऑपरेटिंग प्रणाली ग्राहकांच्या पसंतीस पडू लागली आहे. कंपनीने कार्बन मोबाइल्स, मायक्रोमॅक्स मोबाइल, सेलकॉन, स्वाइप मोबाइल यांसारख्या कंपन्यांसोबत सहकार्य करून ही ऑपरेटिंग प्रणाली बाजारात आणली आहे.

भविष्याची वाटचाल

केवळ एखादे अ‍ॅप प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यापेक्षा एक संपूर्ण प्रणालीच उपलब्ध करून देणे केव्हाही योग्य ठरते. यामुळे आम्ही आमच्या अद्ययावत आवृत्यांमधून ही प्रणाली अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. येत्या काळात ही ऑपरेटिंग प्रणाली वापरणाऱ्यांची संख्या दहा कोटींपर्यंत नेण्याचा आमचा मानस असल्याचे राकेशने सांगितले.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

या कंपनीमध्ये स्नॅपडीलचे कुणाल बहल, रोहित बन्सल यांच्याबरोबर इतर अनेक बीज भांडवलदारांनी गुंतवणूक केली आहे. याचबरोबर कंपनीचे मुख्य उत्पन्नस्रोत हे ऑपरेटिंग प्रणालीचे परवाना शुल्क हेच आहे. याशिवाय कंपनीच्या अ‍ॅप बाजारात देण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातूनही उत्पन्न  होत असते.

नवउद्यमींना सल्ला

अनेक तरुण आपली संकल्पना दुसऱ्यांना सांगण्याबाबत साशंक असतात. आपली संकल्पना कोणी चोरली तर असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. पण तसे न करता आपल्या संकल्पनेवर जास्तीत जास्त लोकांशी चर्चा करा. कारण व्यवसायात दोन टक्के संकल्पना असते आणि ९८ टक्के हे त्याची अंमलबजावणी असते असा सल्ला राकेशने नवउद्यमींना दिला. याचबरोबर आपले सहसंस्थापक आणि आपल्या सोबत काम करणारे हे चांगले निवडणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.ोांना कामाची दृष्टी होणे आवश्यक असल्याचेही राकेशने सांगितले.

@nirajcpandit

नीरज पंडित niraj.pandit@expressindia.com

[jwplayer y8Pn2zMM]