धोकादायक ऐतिहासिक वास्तूबाबत आयआयटीचा अहवाल

प्राजक्ता कदम, मुंबई</strong>

काळा घोडा परिसरातील धोकादायक अवस्थेत असलेली ‘एस्प्लनेड मॅन्शन’ ही इमारत दुरुस्तीच्या पलीकडे गेली असून दुरुस्त केली तरी भूकंपाच्या सौम्य धक्क्यानेही ती कोसळू शकते. त्यामुळे ही इमारत जमीनदोस्त करणेच शहाणपणाचे ठरेल, असा निर्वाळा आयआयटी मुंबईने आपल्या अहवालात दिला आहे.

‘एस्प्लनेड मॅन्शन’मधील ‘आर्मी रेस्टॉरंट’पाठोपाठ अन्य आठ दुकानदारांनाही पालिकेने नोटीस बजावली होती. ग्राहकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या दुकानदारांनी २४ तासांत आपले दुकान बंद करावे. अन्यथा त्यास टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने या नोटिशीद्वारे दिला होता. ‘एस्प्लनेड मेन्शन’मध्ये ‘आर्मी रेस्टॉरंट’शेजारी झेरॉक्स आणि स्टेशनरी साहित्याची सहा, शिंप्याचे एक आणि पान-विडीचे एक अशी एकूण आठ दुकाने आहेत. याशिवाय इमारतीत मोठय़ा प्रमाणावर वकिलांची कार्यालयेही आहेत. पालिकेच्या नोटिशीविरोधात यातील काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे ही इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. उच्च न्यायालयानेही इमारतीची अवस्था लक्षात घेत इमारत १५ मेपर्यंत रिकामी करा. गरज भासल्यास पोलीस बळाचा वापर करून इमारत रिकामी करा, असे आदेश एप्रिल महिन्यात ‘म्हाडा’ला दिले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. तेथे इमारत रिकामी करण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली.

परंतु उच्च न्यायालयाने जेव्हा इमारत तातडीने रिकामी करण्याचे आदेश दिले त्या वेळी इमारतीला गतवैभव देणे खर्चीक आणि सद्य:स्थितीला अशक्यप्राय गोष्ट असल्याचा दावा म्हाडाने केला. तर या इमारतीची आयआयटी मुंबईकडून पाहणी करण्याचे आदेश देण्याची मागणी या इमारतीत कार्यालये असलेल्या वकिलांनी तसेच इमारतीच्या मालकाने न्यायालयाकडे केली. त्याचा खर्च उचलण्याची तयारीही त्यांनी दाखवली. त्यानुसार आयआयटी मुंबईला इमारतीची पाहणी करून ती दुरुस्त वा पूर्ववत करता येईल का याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. नुकताच आयआयटी मुंबईने या प्रकरणी आपला अहवाल सादर केला. ‘म्हाडा’तर्फे अ‍ॅड्. पी. जी. लाड यांनी हा अहवाल उपलब्ध होण्याबाबत न्यायालयाकडे विनंती केली होती. त्यानुसार मंगळवारी ‘म्हाडा’सह अन्य पक्षकार-प्रतिवाद्यांना त्याची प्रत न्यायालयाकडून उपलब्ध झाली. या अहवालात आयआयटी मुंबईने ही इमारत दुरुस्तीपलीकडे असल्याचे आणि त्याची दुरुस्ती केली तरी हे व्यवहार्य ठरणार नाही, असा निर्वाळा दिला आहे. या इमारतीत कोणत्याही प्रकारची संरचनात्मक दुरुस्ती तार्किक वा आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य होणार नाही. इमारतीची दुरुस्ती केली तरी ते धोकादायक असेल. ही इमारत पूर्णपणे बीडाचा वापर करून बांधण्यात आलेली आहे; परंतु इमारतीच्या सद्य:स्थितीचा विचार केला तर इमारतीचे सांधे खिळखिळे होऊन काही ठिकाणी तर ते पूर्णपणे तुटलेले आहेत. सांध्यांमध्ये मोठमोठय़ा भेगा पडलेल्या आहेत. परिणामी इमारतीचा ताठरपणा निघून गेलेला आहे. याशिवाय इमारतीत अतिरिक्त खोल्या, पोटमाळ्यांच्या स्वरूपात अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे इमारतीच्या मूळ संरचनेवर ताण आलेला असून या स्थितीचा विचार केला तर भूकंपाच्या सौम्य धक्क्यानेही इमारत कोसळेल, असे अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे विद्युत केबल आणि जोडणीही अशा स्थितीत आहे, की ती धोकादायक असून त्यामुळे आग लागण्याची दाट शक्यता आहे. इमारतीतील आरोग्य आणि स्वच्छताविषयक स्थितीही चिंताजनक आहे. या सगळ्या बाबींचा विचार करता या इमारतीच्या दुरुस्तीचा घाट घालण्याऐवजी ती जमीनदोस्त करणे सद्य:स्थितीला शहाणपणाचे ठरेल, असा निर्वाळा आयआयटी मुंबईने दिला आहे.