आशिया खंडातील सर्वात मोठा विज्ञान व तंत्रज्ञानाचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा ‘टेकफेस्ट’ हा महोत्सव या वर्षी २६ ते २८ डिसेंबरदरम्यान ‘आयआयटी मुंबई’ येथे पार पडणार आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शोध- संशोधनाला जगासमोर मांडण्याची संधी ‘टेकफेस्ट’च्या माध्यमातून दर वर्षी मिळत असते. यंदा रशिया, नेदरलँड, पोलंड, स्विर्झलड, हंगेरी, दक्षिण कोरिया, बांगलादेश, इराण आदी देशांतील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानात आपल्या संशोधनातून केलेले प्रयोग पाहावयास मिळणार आहेत.
या वर्षी यात ‘रोबोट’ तंत्रज्ञानातील विविध प्रयोगांचा समावेश करण्यात आला आहे. स्वित्र्झलडमधील विद्यार्थ्यांनी बनवलेला ऐकू व बोलू शकणारा जीनबॉट, बांग्लादेशच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले नासा चाँदरोबोट व आपत्कालीन प्रसंगात उपयोगी पडणारे रोबोट, नेदरलँडच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले फुटबॉल खेळणारे ‘डच नाओ टिम रोबोट’ असे अनेक प्रकारचे विविध वैशिष्टय़े असणारे रोबोट व त्यांची प्रात्यक्षिके या वेळी पाहावयास मिळणार आहेत.
याशिवाय दर वर्षीप्रमाणे यंदाही रोबोट तंत्रज्ञान, वेब डेव्हलपमेंट, हॅकिंग आदी विषयांवरील कार्यशाळांचे तसेच रोबोट्रॉन, टेक्नोव्होल्टझ्, डायमेन्शन्स्, एरोस्ट्राईक अशा विविध विषयांवरील स्पर्धाचेही आयोजन केले आहे. या वर्षी देशातील अडीच हजार महाविद्यालयांतील व विदेशातील पाचशे शिक्षणसंस्थांतील सुमारे दीड लाख विद्यार्थी, तंत्रज्ञ व अभ्यासक टेकफेस्टसाठी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.
तज्ज्ञांची व्याख्याने
या महोत्सवात भौतिकशास्त्रातील नोबेल विजेते सर्ज हॅरोच, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, इस्रोचे माजी संचालक के. राधाकृष्णन, स्प्रेडशीटचे निर्माते बॉब फ्रँकस्टन, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, ब्राह्मोसचे निर्माते ए. सिवथनू पिल्लई, बिट टोरेंटचे एरिक लिंकर आदी अनेक मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
टेक्नोहोलिक्स व ओझोन
‘टेकफेस्ट’मध्ये रोज संध्याकाळी ‘टेक्नोहोलिक्स’ हा जगभरातील संगीताचा कार्यक्रम तर ‘ओझोन’ या शीर्षकाखाली विविध प्रकारच्या स्पर्धा, अनौपचारिक कार्यशाळा असतील.

टेकफेस्ट अ‍ॅप
टेकफेस्टसाठी ‘टेकफेस्ट’ अ‍ॅप तयार करण्यात आला असून त्याद्वारे महोत्सवात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांशी विद्यार्थ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अँड्रॉईड मोबाइलधारकांसाठी हा अ‍ॅप असून यातून सर्व कार्यक्रमांचे वेळापत्रक, त्यांचे ठिकाण अशी विविध प्रकारची माहिती मिळणार आहे. यासाठी ‘बिकॉन्स’ या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.