‘पब्जी’ या ऑनलाइन गेमचे व्यसन आणि त्याच्या दुष्परिणांची चर्चा सातत्याने देशभरातील स्वघोषित सजगांमध्ये होत असली, तरी तरुणाईने या खेळाला आपलेसे करीत त्यात असाधारण कौशल्य मिळविली आहेत. या आडवाटेच्या कौशल्याला यंदा मुंबई आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये स्थान मिळाले असून अव्वल ‘पब्जी’ स्पर्धकाला तब्बल दोन लाख रुपयांचे पारितोषिक जिंकता येणार आहे.

मोबाइलवरील ‘पब्जी’ खेळाचे वेड हे सध्या भल्या-बुऱ्या चर्चेचा विषय आहे. घर सोडून पळून जाण्यापासून ते आत्महत्या करण्याच्या घटनांसाठी पब्जीवेडाला जबाबदार ठरविण्यात येत आहे. या खेळावर देशभरात बंदी घातली जावी, अशा मागण्या संस्कृतिरक्षकांकडून केल्या जात आहेत. मात्र  ‘गेमाडपंथी’ तरुणाई यात अधिकाधिक प्रावीण्य मिळवत असून त्यातील कौशल्ये हेरत यंदा आयआयटी ‘टेकफेस्ट’मध्ये ‘पब्जी’चा समावेश करण्यात आला आहे.

होणार काय? : मुंबई आयआयटीमध्ये ३ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत ‘टेकफेस्ट’ होणार आहे. देशातील आघाडीचा तंत्रमहोत्सव म्हणून ‘टेकफेस्ट’ची ख्याती आहे. गेल्या काही वर्षांपासून या महोत्सवात ऑनलाइन खेळांच्या स्पर्धा घेण्यात येतात. या ‘गेमर्स लीग’मध्ये लोकप्रिय ‘पब्जी’बरोबरच गेल्या काही वर्षांपासून ‘सीएस गो’ खेळणाऱ्यांचा सामना यंदाही रंगणार आहे. या दोन्ही खेळांतील विजेत्यांना दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. ‘पब्जी’ खेळणारे कुणीही संघ यात सहभागी होऊ शकतील. सुरुवातीला ‘पब्जी’साठी नोंदणी करणाऱ्या संघांचे आपापसात सामने होतील आणि त्यातील सर्वोत्तम १६ संघांचे ‘टेकफेस्ट’मध्ये सामने होतील.

पब्जी म्हणजे.. : ‘प्लेअरअननोन बॅटलग्राऊण्ड्स’ म्हणजेच पब्जी हा खेळ दक्षिण कोरियाई व्हिडीओ गेम कंपनीने तयार केला. ‘बॅटल रॉयल’ या २००० साली गाजलेल्या जपानी चित्रपटापासून प्रेरणा घेऊन त्याची निर्मिती करण्यात आली. एकाच वेळी शहराच्या, देशाच्या वेगवेगळ्या भागांतून शेकडो खेळाडू यात ऑनलाइन सहभागी होऊ शकतात.

वेळापत्रक १६ डिसेंबरला जाहीर : ‘पब्जी’च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १४ डिसेंबपर्यंत नोंदणी करता येणार आहे. निवड सामन्यांचे वेळापत्रक १६ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून १७ डिसेंबरपासून सामने सुरू होणार आहेत. निवड झालेल्या १६ संघांचे सामने ३ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत ‘टेकफेस्ट’ दरम्यान होणार आहेत.

‘पब्जीची लोकप्रियता पाहून यंदा ‘टेकफेस्ट’मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. या खेळासाठी अनेक कौशल्ये लागतात. आपली दिनचर्या, अभ्यास सांभाळून खेळल्यास खेळ वाईट असू शकत नाही. मर्यादेपेक्षा एखाद्या गोष्टीच्या आधीन होणे हे ऑनलाइन खेळच नाही तर कोणत्याही गोष्टीत वाईटच असते. ऑनलाइन गेम्स खेळणाऱ्यांना करिअरच्या अनेक संधीही भविष्यात मिळू शकतात याची जाणीव करून देणे हादेखील आयआयटी टेकफेस्टमध्ये ऑनलाइन खेळांच्या स्पर्धा घेण्यामागील उद्देश आहे.

– सिद्धार्थ मणियार, टेकफेस्टचे माध्यम समन्वयक