आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे अचाट दाखले

केवळ मानवी मेंदूच्या चेतनांद्वारे नियंत्रण करता येणारा ड्रोन, दुर्मीळ प्राणी-पक्ष्यांची क्षणार्धात माहिती देणारा रोबोट, अपंगांसाठी वरदान ठरणारा ‘बायोनिक प्रोसथेसिस’ व्हच्र्युअल हात आणि चार किलो वजनाची स्कूटर.. क्षणाक्षणाच्या वेगाने प्रगती करत असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे पुरावे देणाऱ्या या वस्तू/साधने पाहायची असतील तर, पवई येथील मुंबई आयआयटीच्या प्रांगणाला जरूर भेट द्या. १६ ते १८ डिसेंबरदरम्यान आयआयटीत होणाऱ्या ‘टेकफेस्ट’मध्ये या सर्व गोष्टी पाहायलाच नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवयाला मिळणार आहेत.

पवई येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा ‘टेकफेस्ट’ देशविदेशातील तंत्रज्ञानाच्या करामतींमुळे मुंबईकरांच्याच नव्हे तर देशभरातील विद्यार्थी-शिक्षक व तंत्रस्नेहींच्या आकर्षणाचा विषय असतो. यंदाही हा महोत्सव तंत्रस्नेहींकरिता पर्वणी घेऊन येणार आहे. या वर्षी ‘टेकफेस्ट’चे मुख्य आकर्षण असणार आहे, अमेरिकेच्या ‘पझलबॉक्स ऑर्बिट’ने बनवलेले ‘माइंड कंट्रोल्ड ड्रोन’, स्वित्झरलॅन्डचे ‘मोर्पोफंक्शनल ड्रोन’, फ्रान्सचे ‘रोलकर्स’ आणि भारताने अंतराळात सोडलेल्या विविध उपग्रहांच्या प्रतिकृती.

‘माइंड कंट्रोल ड्रोन’ हा मेंदूच्या चेतनांद्वारे हाताळता येतो. यासाठी हेडसेटचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान केवळ गमतीशीर नाही तर, पक्षाघाताच्या रुग्णांना ते अतिशय उपयुक्त ठरू शकणार आहे. याशिवाय चालण्याचा वेग ताशी सात मैलांपर्यंत वाढवू शकणाऱ्या ‘रोलकर्स’चाही अनुभव ‘टेकफेस्ट’मध्ये घेता येणार आहे. या शिवाय ‘स्टारवॉर’ या हॉलीवूड चित्रपटातील नजरेचे पारणे फेडणारे रोबोज ‘टेकफेस्ट’मध्ये पाहता येतील. ‘रोबोट बीबी८’ हे प्रदर्शन तर वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारे असेल. रशियाच्या प्रसिद्ध सेंट पिट्सबर्ग विद्यापीठाने बनवलेले विज्ञानाचे नवनवीन आविष्कार येथे पाहता येतील. विद्यापीठाने जगातील सर्वात हलकी स्कूटर, ‘के स्कूटर’ तयार केली असून तिचे वजन फक्त चार किलो आहे. तर थ्रीडी आधारित ‘एचटीसी व्हाइव्ह’ या पॅनोरमिक हेल्मेटद्वारे ‘व्हच्र्युअल ईमेज’च्या दर्शनाने बाल चमू आनंदून जातील. याच विद्यापीठाने तयार केलेला ‘बायोनिक प्रोसथेसिस’ हा व्हच्र्युअल हात अपंगांसाठी वरदान ठरेल. या शिवाय विद्यापीठाचा सहा पायांचा हेक्सापॉड अधिक कार्यक्षमता दाखवून देईल. बांगलादेशातील ‘टिम स्पार्क नॉर्थ युनिव्हर्सिटी’द्वारे तयार करण्यात आलेले रोबोट आज जगात प्रसिद्ध आहेत. यात बॉम्ब डिफ्युजर रोबोट, रेस्क्यू रोबोट इत्यादी काही प्रसिद्ध रोबोट टेकफेस्टमध्ये पाहायला मिळतील.

हम भी किसीसे कम नही!

‘टेकफेस्ट’च्या ‘टेककनेक्ट’द्वारे आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या अत्याधुनिक यंत्रांचा आविष्कारही पाहता येईल. खऱ्याखुऱ्या ‘फॉर्मुला वन’शी मिळत्याजुळत्या कारची केलेली निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे.

तसेच ‘अंडरवॉटर व्हेईकल’मध्ये ‘मत्स्य’ ही एक प्रकारची पाणबुडी पाहण्यासाठी उपलब्ध असेल. मत्स्यने २०१५ साली कॅलिफोíनया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेत अंतिम चापर्यंत मजल मारली होती. आयआयटी-मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘प्रथम’ हा उपग्रह इस्रोने ऑक्टोबर, २०१६ रोजी अवकाशात सोडला होता. या उपग्रहाकडून मिळणाऱ्या ‘डेटा’चे प्रात्यक्षिक येथे विद्यार्थ्यांना पाहावयास मिळेल.

लहान मुलांसाठी आकर्षण

खास लहान मुलांसाठी ‘टेकफेस्ट’ स्वित्र्झलडमधील ‘मोर्पोफंक्शनल ड्रोन’ घेऊन येणार आहे. या आधारे विविध दुर्मीळ प्राण्यांचे दर्शन व अभ्यास करता येईल. हा रोबोट म्हणजे प्राणी, पक्षीनिरीक्षकांसाठी वेगळीच पर्वणी असणार आहे.

इस्रोच्या मदतीने अवकाशातील गमतीजमती

लहान मुलांसाठी अवकाश हे एक न उलगडलेले कोडे आहे आणि म्हणूनच या वर्षीच्या ‘टेकफेस्ट’ची थीम अंतराळावर आधारित आहे. लहान मुलांना अवकाश, अंतराळ या विषयाविषयी कुतूहल वाटावे यासाठी इस्रोच्या मदतीने ‘लाँच व्हेइकल’, सॅटेलाइट आणि इतर अनेक गोष्टी येथे पाहण्याकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत.