पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थतील तब्बल १०० विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस प्लेसमेंट’मधून परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली आहे. करिअरच्या पहिल्या टप्प्यावरच त्यांना परदेशात नोकरी करायला मिळणार आहे.
आयआयटीचा यंदाचा ‘कॅम्पस प्लेसमेंट’चा टप्पा नुकताच पार पडला. त्यात २६० राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदवत तब्बल ९०० हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी दिल्या. ‘प्लेसमेंट’च्या पहिल्याच दिवशी ३७ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी १८२ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या संधी देऊ केल्या आहेत. गेल्या वर्षी ही संख्या अनुक्रमे ३५ आणि १७३ अशी होती. या वर्षीही विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांकडे होता. त्या खालोखाल व्यवस्थापन, सल्लागार, वित्त आणि विश्लेषक क्षेत्राला विद्यार्थ्यांची पसंती होती. ‘प्लेसमेंट’चा दुसरा टप्पा जानेवारी ते जून दरम्यान पार पडेल.
संशोधन आणि विकासाकडे कल वाढतोय
संशोधन आणि विकास क्षेत्रातील नोकऱ्या स्वीकारण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. या क्षेत्रातील १३ कंपन्यांनी यंदा ३५ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देऊ केल्या आहेत. याशिवाय शिक्षण क्षेत्रातील विविध संस्था, कंपन्यांनीही २३ विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आयआयटीच्या ‘प्लेसमेंट’मधील परदेशी कंपन्यांचा टक्काही यंदा वाढला आहे. तब्बल १०० विद्यार्थ्यांना यंदा विविध परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. त्यात अमेरिका, युरोप, जपान, मध्य पूर्वेतील देश, सिंगापूर, तैवान आदी देशातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला. गेल्या वर्षी ८० विद्यार्थ्यांना विविध परदेशी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाल्या होत्या.
सरकारी कंपन्यांचा नगण्य सहभाग
काही वर्षांपूर्वी आयआयटीच्या प्लेसमेंटमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होणाऱ्या सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा यंदाच्या ‘प्लेसमेंट’ पर्वात अत्यंत नगण्य सहभाग होता. केवळ एकच सरकारी कंपनीत यात सहभागी झाली होती.