बेकायदा फलकप्रकरणी दंड भरण्याचे न्यायालयाचे आदेश
बेकायदा फलकबाजी स्वत: करणार नाही आणि कार्यकर्त्यांनाही करू देणार नाही, असे लेखी आश्वासन देऊनही सर्रासपणे बेकायदा फलकबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी या सगळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा पवित्रा घेणारे मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी तडाखा दिला. बेकायदा फलकबाजीप्रकरणी भाजपच्या १२ कार्यकर्त्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंड सुनावत नेता म्हणून त्यातील निम्मी रक्कम शेलार यांनी भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही रक्कम दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना देण्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
न्यायालयाने या वेळेस शेलार यांच्यासह भाजपचे आमदार पराग अळवणी यांना त्यांच्या पदानुसार दंडाची रक्कम भरण्याचेही बजावले आहे. शिवाय मनसेचे कार्यकर्ते सचिन गुरव यांनाही न्यायालयाने दंड सुनावला आहे. तसेच शेलार, अळवणी, गुंजाळ यांच्यासह सगळ्यांनीच पुढील आठवडय़ात होणाऱ्या सुनावणीच्या वेळी दंडाच्या रकमेचा ‘डिमांड ड्राफ्ट’ सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
बेकायदा फलक न लावण्याचे आश्वासन देऊनही शेलार यांचे छायाचित्र असलेली फलकबाजी मुंबईत केल्याचे उघड झाल्यावर न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली होती. न्या. अभय ओक आणि न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळेस शेलार यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या फलकबाजीबाबत काहीच माहीत नसल्याचा पवित्रा घेतला. तसेच बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांना समज देण्यात आल्याचा दावाही केला, परंतु प्रतिज्ञापत्रात याचा काहीच उल्लेख नसल्याने न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावत तो अविश्वसनीय असल्याचे म्हटले. बेकायदा फलकबाजी केल्याबाबत अळवणी व १२ भाजप कार्यकर्त्यांनी न्यायालयाची माफी मागत याची पुनरावृत्ती होणार नाही, अशी हमी दिली.