मुंबई महानगरपालिकेने अखेर शनिवारी चुनाभट्टी येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठान महाविद्यालयातील दोन अनधिकृत मजल्यांवर हातोडा चालविला. वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याच्या मदतीने पालिका अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. मात्र परीक्षा सुरू असल्यामुळे महाविद्यालयातील कर्मचारी आणि प्रशासनाकडून या कारवाईला विरोध करण्यात येत होता. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान महाविद्यालयाचा पाचवा आणि सहावा मजला अनधिकृत असल्याची तक्रार पालिकेकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पालिकेने शनिवारी दुपारी ही कारवाई केली. महाविद्यालय इमारतीच्या ‘बी’ विंगमधील पाचव्या मजल्यावर दुपारी विद्यार्थी परीक्षा देत होते, त्याच वेळी ए विंगमधील पाचव्या मजल्यावर ही कारवाई करण्यात आली. या मजल्यावरील चार वर्ग खोल्या, एक कॅन्टीन, एक संगणक कक्षावर हातोडा चालविण्यात आला. या कारवाईदरम्यान पाचव्या मजल्यावरील अंतर्गत भिंती पाडण्यात आल्या. दरम्यान, या महाविद्यालयाच्या वेळापत्रकानुसार तेथे २३ एप्रिलपर्यंत पदविका परीक्षा, ८ मेपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होणार आहेत.