पालिका, उपजिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई

अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या गोदामांमध्ये सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता ज्वलनशील पदार्थ साठवल्यामुळे मानखुर्दच्या मंडाळा परिसरात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या पाश्र्वभूमीवर उपजिल्हाधिकारी आणि मुंबई महापालिकेने धडक कारवाई करत गेल्या तीन दिवसांत या परिसरातील दीडशेहून अधिक गोदामे जमीनदोस्त केली. भूमाफियांनी बेकायदा उभारलेल्या या गोदामांना भूमाफियांकडूनच आग लावण्यात येत असल्याचेही समोर येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या ५० एकर जागेवर वसलेल्या मानखुर्द मंडाळा येथील या परिसरात पूर्वी ४० ते ५० गोदामे होती. मात्र सध्या याठिकाणी अडीचशे ते तीनशे गोदामे असून यातीन अनेक गोदामे अनधिकृत आहेत. या गोदामांमध्ये मोठय़ा प्रमाणात रसायने, तेल आणि इतर भंगाराचे सामान जमा केले जात होते. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा शॉर्टसर्किटने आगी लागून आग भडकण्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी एका गोदामाची किमत ४० ते ५० लाखांच्या घरात असल्याने काही भूमाफियाच या ठिकाणी आगी लावत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. आगीनंतर ही जागा अडवून या ठिकाणी गोदामे उभी करून या गोदामांची पुन्हा विक्री करण्यात येते. पालिकेतील काही अधिकारी आणि पोलिसांची देखील या ठिकाणी काही गोदामे असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या ठिकाणी काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.

अशाच प्रकारे वर्षांतून दोन ते तीन वेळा या ठिकाणी या आगी लावल्या जातात. याचा मोठा त्रास याच गोदामांच्या बाजूला असलेल्या झोपडीधारकांना होतो. रविवारी पहाटेदेखील या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीत २५ गोदामे जळून खाक झाली. त्यानंतर पालिका आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाने या ठिकाणी कारवाई करण्याचे काम हाती घेतले.

बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार अशा सलग तीन दिवशी या ठिकाणी ही संयुक्त कारवाई  सुरू आहे. यामध्ये  १५२ गोदामे तोडण्यात आली आहेत, तर ३५ गोदामांचे वीज आणि पाणी जोडणी तोडून टाकण्यात आली आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच अशा प्रकारे मोठी कारवाई झाल्याने रहिवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. काही भूमाफियांनी या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त असल्याने ही कारवाई सुरळीत सुरू आहे.

‘तोड कारवाईनंतर या ठिकाणी तारेचे कुंपण घालण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला असून यापुढेदेखील ही कारवाई अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे.    – संतोष भिसे, उपजिल्हाधिकारी, चेंबूर