सदनिका उपलब्ध नसल्याने पालिका हतबल; त्याच विभागात पुनर्वसन करण्याची मागणी

उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तब्बल १५ वर्षे लोटली तरी जलवाहिनीला खेटून असलेल्या झोपडय़ा हटविण्याच्या दुसऱ्या टप्प्यावरच पालिका अडखळली आहे. केवळ झोपडीधारकांना पात्र-अपात्र ठरविण्याच्या कामावर पालिकेचे घोडे खोळंबले आहे. तर सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या झोपडपट्टीवासीयांची त्याच भागात घर देण्याची मागणी असून प्रकल्पग्रस्तांसाठी त्याच विभागात घर उपलब्ध नसल्याने पुनर्वसनाचे घोंगडेही भिजत पडले आहे. परिणामी आता पालिका अधिकारी पेचात पडले आहेत.

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी मुख्य तानसा जलवाहिनी मुंबईच्या विविध भागांतून जाते. या जलवाहिनीला खटून अनेक झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. इतकेच नव्हे तर सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष असल्यामुळे काही ठिकाणी जलवाहिनीवरच झोपडय़ा उभ्या करण्यात आल्या आहेत. जलवाहिनीच्या दुतर्फा १० मीटर अंतरावरील झोपडय़ा तात्काळ हटविण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.  मात्र घाटकोपर परिसरातून जाणाऱ्या जलवाहिनीलगतच्या झोपडय़ा नियोजित वेळेत हटविण्यात पालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील काम अद्याप अपूर्ण राहिले आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांत अनुक्रमे अंधेरी, माटुंगा आणि सांताक्रूझ, वांद्रे, कुर्ला परिसरांतील जलवाहिनीला खेटून असलेल्या झोपडय़ांमध्ये सर्वेक्षणाचे काम अद्याप सुरू आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे तब्बल ३,४८९ व ५,८१८ झोपडीधारक आहेत. सर्वेक्षणाअंती या झोपडीधारकांना पात्र आणि अपात्र ठरविण्यात येणार आहे. अपात्र मंडळींनी हरकत घेत पालिकेचे दरवाजे ठोठविल्यास त्यांची सुनावणीही घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या टप्प्यातील कामही नियोजित वेळेत पूर्ण होईल की नाही याबाबत साशंकताच आहे.

नागरी सुविधांचा अभाव

जलवाहिनीलगतच्या झोपडपट्टीवासीयांनी आता ५०० मीटरच्या परिघात आपले पुनर्वसन करावे असा आग्रह धरला आहे. काही राजकीय मंडळींनीही या मागणीसाठी पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आपला विभाग सोडून रहिवासी माहुलला स्थायिक होऊ शकणार नाहीत. तेथे नागरी सुविधांचा अभाव असल्याची तक्रार नगरसेवक करू लागले आहेत. मात्र त्याच परिसरात प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्याच विभागात या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणे पालिकेला शक्य होऊ शकलेले नाही. परिणामी पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत पालिका अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.