बेहरामपाडय़ातील अनधिकृतपणे फोफावणाऱ्या झोपडय़ांच्या प्रश्नावर लोकसत्ता-मुंबईने वाचा फोडल्यानंतर आता कुठे मुंबई महानगरपालिका खडबडून जागी झाली आहे. वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकाला लागून उभ्या राहणाऱ्या या पाचपाच मजली झोपडय़ांच्या अतिक्रमणाबाबत खुद्द पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अहवाल मागविला आहे.
वांद्रे स्थानकातून पूर्वेकडे जाणाऱ्या रेल्वेच्या पुलालाच या झोपडय़ांनी गिळंकृत केले आहे. इतकेच नव्हे तर येथील नाल्यालाही झोपडय़ांनी विळखा घातला आहे. नाले परिसरात ५०० हून अधिक अनधिकृत झोपडय़ा असून बेहरामपाडय़ात तर झोपडय़ांची उंची पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र अनेक निवासी कारणाबरोबरच छोटे-मोठय़ा व्यवसायासाठी बळकावले गेलेले इथले क्षेत्र अतिक्रमण कारवाईमुक्त राहिले आहे.
गेल्या आठवडय़ात लोकसत्ता-मुंबईने या अतिक्रमणाबाबत सविस्तर वृत्त देत यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेशी कसा खेळ चालविला आहे, याकडे लक्ष वेधले होते. तसेच, या झोपडय़ांवर कारवाई करण्याचा विषय पालिका, एमएमआरडीए आणि पोलिस प्रशासन कसे एकमेकांकडे टोलवित आहेत, यावरही प्रकाश टाकला होता. अखेर आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत येथील अतिक्रमणाबाबत अहवाल मागविला आहे. अहवाल आल्यानंतर या झोपडय़ांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे मेहता यांनी ‘लोकसत्ता-मुंबई’ला सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2016 2:58 am