एमआयडीसीतील अवैध डान्स बारवर छापे

मुंबई : डान्स बार प्रकरणांत सहकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचे संकेत अन्य पोलीस ठाण्यांसह बारमालकांनी गांभीर्याने घेतलेले नाहीत. अजूनही मुंबईत स्थानिक पोलीस ठाण्याच्या आशीर्वादामुळे अवैध डान्स बार सुरू असून खुद्द पोलीस आयुक्तांना अमली पदार्थ विरोधी पथकाच्या उपायुक्तांच्या मदतीने डान्स बारवर कारवाई करावी लागली.

याआधी अवैध डान्स बारना अभय दिल्याचा ठपका ठेवत गावदेवी, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांसह सहा पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. शहरात अवैध डान्स बारना थारा देऊ नका असे स्पष्ट संकेत या कारवाईने आयुक्त बर्वे यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही डान्स बार सुरू आहेत. शनिवारी रात्री अंधेरीतील नाईट लव्हर्स या अवैध डान्स बारवर अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी धाड घालून १४ बारबालांसह ३९ जणांवर कारवाई केली. ऑर्केस्ट्राच्या परवान्याआड हा डान्स बार चालवला जात होता.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधेरी-कुर्ला जोडरस्त्यावरील अपना ढाब्यामागील व्यावसायिक इमारतीत नाईट लव्हर्स या दुमजली बारमध्ये बारबाला नृत्य करतात, ग्राहक त्यांच्यावर दौलतजादा करतात, अशा तक्रारी बर्वे यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी या तक्रारींची शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेश लांडे यांना दिल्याची माहिती मिळते.

लांडे आणि पथकाने खातरजमा केली असता तक्रारींमध्ये तथ्य आढळले. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास लांडे आणि पथक बारमध्ये शिरले तेव्हा दुसऱ्या मजल्यावरील दोन प्रशस्त हॉलपैकी एकात डान्स बार सुरू असल्याचे आढळले. बारच्या दहा कर्मचाऱ्यांसह १५ ग्राहक आणि १४ बारबालांविरोधात नव्या कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांकडे सोपवण्यात आला. ओळखीतल्या किंवा नेहमीच्या ग्राहकांव्यतिरिक्त इतरांना या बारमध्ये प्रवेश मिळत नव्हता. अटक ग्राहकांपैकी बहुतांश व्यापारी, उच्चभ्रू वर्गातील आहेत, अशी माहिती मिळते.