त्वचारोगावरील उपचारांसाठी डॉक्टरांकडून सुचवण्यात येणारी व किमतीने अत्यल्प असलेली बेटनोवेट सी क्रीम व बेटनोवेट एन क्रीम यांचा गैरवापर होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागास प्राप्त झाली होती. यात मुंबईतील देसाई फार्मा या कंपनीने मोठय़ा प्रमाणात या औषधांचा साठा अवैधरीत्या विकल्याचे समोर आले. त्यामुळे या औषधांचा साठा जप्त करून संबंधितांविरोधात एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीसह औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
बेटनोवेट सी क्रीम व बेटनोवेट एन क्रीम ही औषधे त्वचारोगांवरील उपचारांसाठी डॉक्टरांद्वारे रुग्णांना सुचविली जातात. या औषधांची किंमत प्रत्येक ग्रॅममागे एक रुपया इतकी अल्प असल्यामुळे त्याचा गैरवापर त्वचा गोरी होण्याकरितादेखील काही जणांकडून करण्यात येत होता. या औषधांच्या उत्पादकाने या औषधांचा मोठय़ा प्रमाणातला साठा देसाई फार्मा, बाबू गेनू रस्ता, प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई यांना विकल्याचे निदर्शनास आले होते. या कंपनीने मे. प्रवीण मेडिकल्स, भिवंडी या अस्तित्वातच नसलेल्या औषधी दुकानाच्या नावे खोटी बिले बनवून विना बिल व प्रत्यक्ष रोखीने तब्बल ४० लाखांचा साठा मे. आदर्श सेल्स, भात बाजार, मुंबई यांच्या हितेश भागीदार यांना विकला. या मे. आदर्श सेल्स यांनी सदर औषधीचा साठा रायपूर, छत्तीसगड येथील गौतम लालवानी या अज्ञात इसमास रोखीने विकल्याचे उघड झाले. त्यामुळे हितेश भागीदार यांनी या औषधांचा आणखी दोन लाखांचा साठा अमृतलाल संघवी यांच्या मे. संघवी एंटरप्रायजेस यांच्याकडूनही विना बिल व रोखीने खरेदी केल्याचेही समजले. एल्फिन्स्टन रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूर, छत्तीसगड येथील गौतम लालवानी या औषधांची कशा प्रकारे विल्हेवाट लावतात याचीही चौकशी सुरू आहे.

बेटनोवेट क्रीमपासून सावध व्हा
बेटनोवेट सी क्रीम व बेटनोवेट एन क्रीम या दोहोंमध्येही स्टिरीऑईड असल्यामुळे औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मोठय़ा प्रमाणात विकले जात आहे. औषधाचा अयोग्यरीत्या त्वचेवर वापर केल्यास चेहरा कुरूप होणे, त्वचा पातळ होणे, लहान मुलांची वाढ खुंटणे यासारखे घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. असे काही त्वचारोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची खरेदी व वापर करू नये असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले.