डोंबिवली महापालिकेतील ठरावीक अधिकारी, लोकप्रतिनिधींनी भूमिपुत्रांना हाताशी धरून गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा ते टाटा पॉवर हाऊसच्या दरम्यान वसवलेली एक अनधिकृत ‘मार्बल’ नगरी या भागातील बडे व्यापारी आणि ठेकेदारांचे आश्रयस्थान बनू पाहत आहे. एखाद्या लहानग्या मॉलला लाजवेल अशा थाटात उभ्या करण्यात आलेल्या या व्यापारी वस्तीमधील १०० बेकायदा दुकाने, झाडांची रोपे विकणाऱ्या नर्सरी महापालिकेतील ‘लाचप्रतापां’चे ज्वलंत असे उदाहरण ठरू लागले आहे.
हे सारे कसे घडले?
महापालिकेतील काही ठरावीक नगरसेवक, अधिकाऱ्यांची ‘दुभती गाय’ म्हणून या अनधिकृत व्यावसायिक वस्तीकडे पाहिले जाते. डोक्यावर टाटा पॉवरची उच्च दाबाची वाहिनी आणि पायाखाली महापालिकेची जलवाहिनी असताना या भागात बिनधोकपणे दुकाने थाटण्याचे उद्योग सुरू आहेत. डोंबिवली पूर्व भागातील पालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या घरडा सर्कल, बंदिश हॉटेल ते टाटा पॉवर हाऊस या रस्त्यावर दिवसाला लक्षावधी रुपयांचा व्यवहार करणारी मार्बल व्यावसायिकांची १०० अनधिकृत दुकाने महापालिकेतील यंत्रणांना वाकुल्या दाखवत उभी राहिली आहे.
 यापूर्वी झोपडय़ा तसेच ताडपत्री टाकून उभी करण्यात आलेली लहानगी दुकाने पक्की होऊ लागली आहेत. लाद्या, फरशा, कडप्पे, देव्हारे, घर सजावटीचे सर्व साहित्य या ठिकाणी मिळते. उच्च प्रतीचे संगमरवरी साहित्य येथे मिळत असल्याने ही अनधिकृत ‘मार्बल नगरी’ वर्षांला कोटय़वधी रुपयांचा मलिदा ओरपण्याचे ठिकाण बनले आहे. महापालिकेस कर म्हणून दमडीही भरायची नाही, ग्राहकांशी कच्च्या पावत्यांचा व्यवहार करायचा आणि शासनालाही गंडा घालायचा, असे प्रकार या ठिकाणी वर्षांनुवर्षे सुरू आहेत.
महापालिकेने मार्च २०११ मध्ये या रस्त्यावरील ७८ मार्बल लादी विक्रेत्यांना येथील दुकानांची अधिकृतता तपासण्यासाठी नोटिसा पाठविल्या होत्या. दुकाने उभी असलेल्या जमिनीची कागदपत्रे, बिनशेती परवाना, बांधकाम परवानगी, पूर्णत्वाचा दाखला, मोजणी नकाशा याविषयीची माहिती येथील व्यापाऱ्यांकडून संकलित होणे आवश्यक होते. मात्र  केवळ नोटिसा बजावून अधिकारी वेळ मारून नेत असल्याने हा सगळा अनधिकृत व्यापार दिवसेंदिवस पाय पसरू लागला आहे.
नर्सरीचे रान!
घरडा सर्कल ते बंदिश हॉटेलपर्यंतच्या मार्गावर यापूर्वी विविध प्रकारच्या झाडांची रोपे विकणारी एक नर्सरी होती. मडकी विकणारे दोन ते तीन माठविक्रेते होते. आता या रस्त्याच्या दरम्यान तीन ते चार भव्य नर्सरीज झाल्या आहेत. सर्व रोपे रस्त्याला खेटून लावण्यात येतात. यापूर्वी ६०फुटी दिसणारा हा रस्ता या अतिक्रमणांमुळे अरुंद बनू लागला आहे. येथील टेकडीचा भाग खोदून नर्सरी विकसित करण्याचे काम केले जात आहे. गुजरात, राजस्थानमधील मडक्यांचे व्यापारी या भागात अनधिकृतपणे माठविक्रीचा व्यवसाय करतात.
नगरसेवक, अधिकाऱ्यांचे आशीर्वाद
या बेकायदा १०० मार्बल विक्रेत्यांना, नर्सरीवाल्यांना काही नगरसेवक, उच्चपदस्थ महापालिका अधिकारी तसेच स्थानिक गावगुंडांचा पाठिंबा आहे. वर्षांला लक्षावधी रुपयांचा मलिदा मिळविण्यासाठी ही वस्ती फायदेशीर ठरली आहे.
काही बडे नेते, नगरसेवक, अधिकाऱ्यांच्या घरांची सजावट या मार्बल नगरीतून केली गेल्याची खमंग चर्चाही या भागात उघडपणे सुरू असते. मार्बलच्या या वस्तीला लागूनच पाणीपुरवठा विभागाला एक जलवाहिनी टाकायची होती. ही जलवाहिनी बेकायदा दुकानांच्या ठिकाणाहून टाकली तर दुकाने तोडावी लागणार होती. त्यामुळे जलवाहिनीचा काही भाग दुसरीकडून वळवून या बेकायदा व्यापारी वस्तीला पाठीशी घालण्यात आले. मार्बलची दुकाने वाचविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने सर्वसाधारण सभेलाही अंधारात ठेवल्याचा आरोप आता होतो आहे.  
ही मार्बलनगरी जमीनदोस्त झाली तर या रस्त्याचे रुंदीकरण, प्रशस्त रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. या भागातून होणारी पाणी चोरी थांबेल. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना मुबलक पाण्याचा पुरवठा होऊ शकेल. मात्र, धनाढय़ व्यापाऱ्यांनी पोसलेल्या या वस्तीला हात लावण्याची हिंमत सध्या तरी महापालिका अधिकाऱ्यांमध्ये नाही.