News Flash

अवैध इंधन पंपावर छापा

१२ लाख रुपयांचे डिझेल हस्तगत; ३ आरोपी अटकेत

गुन्हे शाखेने बुधवारी मुंबईत गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेला अवैध इंधन पंपच शोधून काढला.

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : शहरात आजवर इंधन पोच करणाऱ्या टँकर किं वा कप्तानाला हाताशी धरून परदेशी मालवाहू जहाजांमधील पेट्रोल, डिझेल चोरून ते काळ्या बाजारात विकणाऱ्या अनेक टोळ्या पोलिसांनी गजाआड केल्या. मात्र गुन्हे शाखेने बुधवारी मुंबईत गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेला अवैध इंधन पंपच शोधून काढला. वडाळा ट्रक टर्मिनल येथे उभारण्यात आलेल्या या अवैध पंपाद्वारे संपूर्ण टाळेबंदीत हजारो लिटर इंधन विकण्यात आले, तर कारवाईदरम्यान १२ लाख रुपये किमतीचा डिझेल साठा जप्त करण्यात आला.

गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक (कक्ष १) विनायक मेर यांना वडाळा ट्रक टर्मिनल येथील दशमेश सव्‍‌र्हिस सेंटर या सीएनजी इंधन संच वाहनात बसवून देणाऱ्या कं पनीआड सुरू असलेल्या या अवैध पंपाची माहिती मिळाली. मेर आणि पथकाने या माहितीची खातरजमा करून बुधवारी छापा घातला. तेव्हा एक प्रवासी बसमध्ये डिझेल भरले जात होते. पंप सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांची विचारणा उपस्थित कर्मचाऱ्यांना करताच त्यांची पळापळ सुरू झाली. यापैकी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली, तेव्हा हा पंप सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नाही, अशी माहिती पुढे आली. या तीन व्यक्तींसह त्यांच्या अन्य साथीदारांविरोधात वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यात या तीन आरोपींना अटक करून हे प्रकरण गुन्हे शाखेने तपासासाठी स्वत:कडे घेतले.

प्रभारी निरीक्षक मेर यांनी दिलेल्या माहितीनुसार इंधनविक्री हा संवेदनशील विषय असून त्याचे नियमन केंद्र शासनाकडे आहे. पंप सुरू करण्यापासून इंधनाची वाहतूक, साठा करण्यासाठी विविध यंत्रणांच्या परवानग्या आवश्यक असतात. इंधन ज्वलनशील, स्फोटक असल्याने पेट्रोलियम अ‍ॅण्ड एक्स्प्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनने सुरक्षिततेसाठी कडक नियम घालून दिले आहेत.

तरणजीत बंगा, अमरजीतसिंग आणि इरफान जुनेजा अशी अटक आरोपींची नावे आहेत. दशमेश सव्‍‌र्हिस सेंटरच्या मोकळ्या जागेत आरोपींनी १५ हजार लिटर क्षमतेची टँकरची टाकी बसविली. अतिरिक्त इंधनसाठा १० हजार लिटरच्या सिन्टेक्स टाकीत के ला. नियमांनुसार इंधनासाठय़ासाठी जमिनीखाली टाकी बांधावी लागते. मात्र या पंपावर टाक्या जमिनीच्या वर होत्या आणि त्यातूनच थेट इंधनपुरवठा होत होता. ही बाब गुन्हे शाखेच्या खबऱ्याने हेरली.

डिझेल चोरीचे

परवानगीच नसल्याने तेल कं पन्यांकडून या पंपाला विक्रीसाठी इंधनपुरवठा होत नव्हता. असे असूनही या पंपावर स्वस्तात (६७ रुपये लिटर) डिझेल विकले जात होते. त्यामुळे आरोपींनी तेल शुद्धीकरण प्रकल्पांमधून पंपांना इंधन वितरित करण्यासाठी निघालेल्या टँकरचालकांना हाताशी धरत डिझेल चोरून स्वत:च्या पंपावर आणले असावे किं वा इंधन चोरणाऱ्या टोळ्यांकडून स्वस्तात विकत घेतले असावे, असा अंदाज आहे. याबाबत आरोपींकडे चौकशी सुरू असल्याचे मेर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 2:26 am

Web Title: illegal oil pump dd70
Next Stories
1 नौदलातील ‘सी हॅरिअर’ वांद्रेतील वाहतूक बेटावर
2 कांदळवन अभयारण्याला अनेकांच्या भेटी
3 तीन महिलांकडून क्लीनअप मार्शलला मारहाण
Just Now!
X