मुंब्रामधील लकी कंपाऊंडमधील निकृष्ट दर्जाची इमारत कोसळून ७४ जणांना जीव गमवावा लागल्यानंतर संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ातील धोकादायक आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, असे असले तरी ठाणे परिसरात अशा प्रकारे कायम जीवन-मरणाच्या सीमारेषेवरील आयुष्य जगणाऱ्या रहिवाशांच्या अन्य वस्त्याही येथे दिसून येत आहेत.
कळवा-ठाण्याच्या सीमारेषेवर भर खाडीत अशीच एक झोपडपट्टी असून त्यात तब्बल लाखभरांची वस्ती आहे.
कळव्यात अगदी खाडीला खेटूनच ही वसाहत आहे. खाडीच्या दुसऱ्या काठावरून पाहताना खारफुटीच्या गालिचावर असंख्य झोपडय़ा उगवल्याचे चित्र दिसते. रस्त्यालगतच्या जुन्या वस्तीत आता पक्क्य़ा स्वरूपाच्या चाळी झाल्या असून निरनिराळ्या रहिवासी संघाच्या नावाने त्या ओळखल्या जातात. या चाळी जुन्या आहेत. मात्र आतील भागात भर खाडीत झोपडय़ा उभारण्याचे काम सातत्याने सुरू आहे. कोणत्याही प्राधिकरणाचे त्याकडे लक्ष नाही. त्यामुळे या वस्तीचा आकार दिवसेंदिवस वाढत असून त्यांचा परीघ दिवसेंदिवस वाढतच आहे. पावसाळ्यात हा सर्व परिसर जलमय होतो. अनेक झोपडय़ांमध्ये पाणी शिरते. तेवढय़ा पुरते रहिवासी अन्यत्र आसरा घेतात आणि पुन्हा आपल्या झोपडीत येतात. मात्र २६ जुलै २००५ सारखी अतिवृष्टी झाली, तर येथे फार मोठा अनर्थ घडू शकतो. या झोपडपट्टीचे वेगवेगळे विभाग असून काही वस्त्यांच्या दर्शनी भागात त्यांना अभय देणाऱ्या राजकीय नेत्यांच्या सुहास्य प्रतिमांचे फलक स्वागत करताना दिसतात.
सुविधांचे टॉवर
साकेत कॉम्प्लेक्ससमोरील खाडीभागातलगतच भली मोठी झोपडपट्टी उभारण्यात आली असून या झोपडय़ांना राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्त असल्याची चर्चा आहे. बैठय़ा झोपडय़ांच्या या जंगलात ठळकपणे दिसून येतात ते सार्वजनिक शौचालयांचे टॉवर. जुन्या वस्त्यांमध्ये या सुविधा असल्या तरी दररोज नव्याने या भागात रहायला येणारेही या सुविधांचा लाभ घेतात. स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या प्रभावाने अथवा दबावाने महापालिका प्रशासन या भागात जीवनावश्यक सुविधा पुरवीत असल्याचे दिसून येते.  
वहिवाटही धोकादायक
पुल ओलांडून कळव्यात जाताना डावीकडे वळून हा खाडीतल्या झोपडपट्टय़ांमध्ये जाता येते. मात्र येथील अनेक रहिवासी सध्या ये-जा करण्यासाठी ठाणे-कळवा दरम्यान असलेल्या खाडीवरील जलवाहिन्यांच्या पुलाचा वापर करतात. सध्या हा पुल अतिशय कमकुवत झाला असून येथून प्रवास करणे धोकादायक असल्याचा फलकही येथे दिसतो. तरीही खाडी किनारच्या वस्तीतील अनेकजण वेळ वाचविण्यासाठी दररोज हा धोका पत्करतात.
एक हजारात झोपडी
ठाण्यात सध्या सर्वात स्वस्त निवारा या खाडीकिनारी उपलब्ध आहे. काही बांबू आणि चार पत्रे ठोकून झोपडी तयार केली जाते. त्यासाठी फारतर हजार रुपये खर्च येतो. सुरूवातीचे काही महिने गरजूंना येथे फुकट अथवा अगदीच किरकोळ भाडे घेऊन निवारा दिला जातो. काही महिने गेल्यानंतर मग तिथे पक्की झोपडी बांधली जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.