लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई :  वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या समुद्रातील कामाची साधनसामग्री नेण्यासाठी जूहू किनाऱ्यावर भरती-ओहोटी क्षेत्रात कच्च्या रस्त्याऐवजी पक्का रस्ता बांधला जात असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली आहे. मात्र हे काम तात्पुरतेच असल्याचा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा दावा आहे.

वांद्रे ते वर्सोवा दरम्यानच्या नऊ किमी लांबीच्या  सी लिंकच्या कामास गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस सुरुवात झाली. सुरुवातीस सी लिकंच्या वांद्रेकडील जमिनीवरील पाइलिंगचे काम हाती घेण्यात आले. तर सध्या वर्सोवा येथे जुहू कोळीवाडय़ाजवळून समुद्रातील कामासाठी साधनसामग्री नेण्यासाठी रस्त्याचे काम सुरू आहे. पर्यावरण कार्यकर्ते झोरु भथेना यांनी याच कामावर आक्षेप नोंदवला आहे.

सी लिंकच्या परवानगीमध्ये भराव घालणे, अथवा किनाऱ्यावर रस्ता बांधण्याचा समावेश नाही. त्यामुळे हे काम सागरी किनारा नियमन क्षेत्राचा भंग करणारे असल्याचे, झोरु भथेना यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या संदर्भात लेखी तक्रार राज्याचे पर्यावरण मंत्रालय, महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे केली आहे. अशा कामांसाठी रस्त्याऐवजी रॅम्पचा वापर करण्याचे निर्देश असताना रस्ता का बांधला जात आहे, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

‘या रस्त्याचे काम तात्पुरत्या स्वरुपाचे असून, रबर फिलिंग आणि स्टील जाळ्यांचा वापर दगडांना बांधून ठेवण्यासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे किनाऱ्याचे नुकसान होणार नसून, काम संपल्यावर ही जागा पूर्ववत केली जाईल,’ असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर या तक्रारीवर कार्यवाही न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग स्वीकारला जाईल असे झोरु भथेना यांनी सांगितले. तीन वर्षांंपूर्वी सी लिंकच्या कास्टिंग यार्डवरूनदेखील भथेना यांनी न्यायालयीन लढाई दिली होती. त्यावेळी महामंडळाने कास्टिंग यार्ड थेट जुहू बीचवर प्रस्तावित केले होते. अखेरीस तो पर्याय सोडून देण्यात आला होता.