मुलुंडमधील सरकारी भूखंडावर उभारलेल्या अनधिकृत झोपडय़ांना स्थानिक रहिवाशांनी आग लावल्यानंतर पोलिसांनी नगरसेवकासह स्थानिक नेत्यांना अटक केल्याच्या घटनेचे पडसाद सोमवारी पालिका सभागृहात उमटले. अतिक्रमण करणाऱ्यां मोकाट सोडून लोकप्रतिनिधींविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षिय नगरसेवकांनी पालिका सभागृह तहकूब करण्याची आग्रही मागणी केली. या घटनेचा निषेध करीत महापौरांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
मुलुंडमधील नीलमनगरात नाल्यावरच मोठय़ा संख्येने बांधण्यात आलेल्या अनधिकृत झोपडय़ांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशी संतप्त झाले आणि त्यांनी रस्त्यावर उतरून झोपडय़ांना आग लावली.
मात्र या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना, मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली. त्यात नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचा समावेश होता. या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी पालिका सभागृहात उमटले. भाजप नगरसेवक मनोज कोटक यांनी एका हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे या घटनेवर प्रकाशझोत टाकला.
सभागृह नेते यशोधर फणसे, विरोधी  पक्षनेते ज्ञानराज निकम, भाजपचे गटनेते दिलीप पटेल, मनसेचे गटनेते दिलीप लांडे, सपाचे गटनेते रईस शेख यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला. तसेच सभागृह झटपट तहकूब करण्याची मागणी केली. अखेर महापौर सुनील प्रभू यांनीही या घटनेचा निषेध करीत सभागृहाचे कामकाज तहकूब केले.