आपल्याला शाळेत असताना भौतिक शास्त्र आवडायचे पण वाणिज्य शाखेला गेल्याने आयुष्यभर केवळ हिशेबामध्ये वेळ गेला, ही खंत साठाव्या वर्षी निवृत्ती स्वीकारल्यानंतर सुधीर दवे यांना तीव्रपणे जाणवली. आता ती आवड पूर्ण व्हावी यासाठी त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरविले. विविध विद्यापीठांची संकेतस्थळे शोधली. पण त्यांना प्रवेश देईल, अशी कोणतीच संस्था नव्हती. अखेर त्यांच्या मुलाने त्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय सांगितला आणि त्यांनी इंटरनेटवरून भौतिकशास्त्राचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. अवघ्या महिन्याभरात त्यांना भौतिकशास्त्रातील अनेक सिद्धान्तांची माहिती झाली. आता ते प्रात्यक्षिकाचीही तयारीही करू लागले आहेत. दवे यांना ऑनलाइन शिकवणाऱ्या शिक्षकांची नावे कदाचित माहिती असतील वा नसतील. पण त्या शिक्षकांविषयी त्यांना आदर मात्र जरूर आहे. आभासी जगातील अशा शिक्षकांची संख्या सध्या वाढत असून त्यांच्याकडून होणारे विद्या‘दान’ ही सर्वाना आपले वाटू लागले आहे.
‘व्हिडिओचा वापर शिक्षणात नवबदल घडवून आणण्यासाठी करा’, असा संदेश सर्वत्र पसरवत सलमान खान या अमेरिकन तरुणाने ६६६.‘ँंल्लूंंीिे८.१ॠ  नावाचे संकेत स्थळ सुरू करीत शिक्षण प्रचारास सुरुवात केली. यानंतर ऑनलाइन शिक्षणाला एक नवी दिशा मिळाली. आजमितीस जगभरात १५० हून अधिक चांगल्या दर्जाचे ऑनलाइन शिक्षण देणारे पोर्टल्स उपलब्ध आहेत. यातील काही पोर्टल्सही खुल्या शिक्षणासाठी आहेत तर काही ठरावीक उद्देशाने काम करणारी आहेत. या सर्व संकेतस्थळांचे एकत्रिकरण करून एक शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम यूटय़ूबने केले आहे.
असे विविध शैक्षणिक व्हिडीओ एकत्र आणून त्याचा वापरकर्त्यांना फायदा व्हावा यासाठी यूटय़ूबने विविध विभाग तयार केले आहेत. यामध्ये यूटय़ूब स्कूल्स, यूटय़ूब एज्यु, यूटय़ूब टीचर्स आदी प्रकारांचा त्यात समावेश आहे. याशिवाय काही प्रसिद्ध संकेतस्थळांवरील व्हिडीओजचेही एकत्रिकरण करण्यात आले आहे. यूटय़ूब स्कूल्स या विभागात शाळांना त्यांचे लॉगइन करून विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडीओज विद्यार्थ्यांना दाखविता येतात. तर यूटय़ूब टीचर्स या विभागात वर्गात कसे शिकवावे, विविध देशांमध्ये विविध प्रांतांमध्ये कशाप्रकारे मुलांना शिकविले जाते या विषयांना वाहिलेले ४०० हून अधिक व्हिडीओज देण्यात आले आहेत. तर विविध शैक्षणिक प्रयोगांची ओळख करून देणाऱ्या जगभरातील ७० लाखांहून अधिक व्हिडीओजचा संग्रह यामध्ये करण्यात आला आहे.
ई-शिक्षणाची दिशा
एमआयटीमधून तीन पदव्या मिळाल्यानंतर खान अकादमीचा संस्थापक सलमान खान याने एमबीए केले. यानंतर सन २००४मध्ये आपल्या चुलत बहिणीला गणित शिकविण्यासाठी त्याने सर्वप्रथम याहूच्या डुडल्सचा वापर केला. नंतर इतरांनाही मदत व्हावी म्हणून ते व्हिडिओ त्याने यूटय़ूबवर अपलोड केले. या व्हिडीओजना मिळणारा प्रतिसाद मिळाल्याने खान याने २००९मध्ये  http://www.khanacademy.org  हे संकेतस्थळ सुरू केले. संकेतस्थळावर आपल्याला पाहिजे त्या विषयाचे शिक्षण अगदी मोफत उपलब्ध होते.  व्हिडीओ माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचू शकते असे सलमान खान सांगतो.     मुंबई आयआयटीतही अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी http://ask.co-learn.in/  हे संकेतस्थळ सुरू केले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सैद्धांतिक प्रश्नांची उत्तरे दिली जातात. प्राध्यापकांच्या व्याख्यानाचे व्हिडीओही येथे उपलब्ध आहेत.