७/११च्या निकालपत्रात न्यायालयाचे ताशेरे
शेकडो मुंबईकरांचे प्राण घेणाऱ्या ७/११ बॉम्बस्फोट मालिकेच्या तपास करणाऱ्या तपासयंत्रणांची दिशाभूल करण्याचा यशस्वी प्रयत्न इंडियन मुजाहिद्दीनने पद्धतशीरपणे केला आणि त्यांच्या या सापळ्याला आपल्या तपासयंत्रणा बळी पडल्या, अशा शब्दांत न्यायालयाने ७/११ बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालपत्रात तपासयंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी सादीक शेख याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे कबुली देताना बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचे सांगितले होते. मात्र न्यायालयात त्याने आपले विधान फिरवून तपासयंत्रणांना तोंडघशी पाडले. अखेर त्याची सुटका करण्यात आली. त्या अनुषंगाने न्यायालयाने तपासयंत्रणांना फटकारले आहे.
बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सादीक शेख याला अटक केली. सादीकनेही गुन्हा कबूल करत या बॉम्बस्फोटांमागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याची माहिती दिली. त्या आधारावर मुंबई पोलिसांनी आपला जबाब न्यायालयात नोंदवला. प्रत्यक्षात मात्र सादीकने आपल्या विधानाशी फारकत घेतल्याने मुंबई पोलीस तोंडघशी पडले होते. परिणामी सादीकला या प्रकरणातून मुक्त करण्याची वेळ आली.
या प्रकरणी पोलिसांनी केवळ आरोपीच्या कबुलीजबाबावर विश्वास न ठेवता स्वत: तपास करणे आवश्यक होते, अशी टिप्पण्णी न्यायालयाने आपल्या निकालपत्रात केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने नेमका योग्य तपास करत या प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा हात नसून लष्कर ए तोयबाचा समावेश असल्याचे सिद्ध केले. त्यासाठी त्यांनी खोलवर तपास करत सिद्धीकीचा दावा खोडून काढला होता, असेही या निकालपत्रात म्हटले आहे. दरम्यान, या १२ दोषींना फाशीची शिक्षा सुनवावी, अशी मागणी केली जात होती. प्रत्यक्षात पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हे १२ आरोपी या प्रकरणात दोषी असले, तरी कटाच्या नियोजनात त्या सर्वाचा सहभाग होता. मात्र बॉम्ब ठेवून हा कट पूर्णत्त्वास नेण्याचे काम पाच जणांनी केले होते. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचेही या निकालपत्रात म्हटले आहे.

निकालपत्रातील टिप्पणी

’पोलिसांनी केवळ आरोपीच्या कबुलीजबाबावर विश्वास न ठेवता स्वत: तपास करणे आवश्यक होते,
’दहशतवाद विरोधी पथकाने नेमका योग्य तपास करत या प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा हात नसून लष्कर ए तोयबाचा समावेश असल्याचे सिद्ध केले. त्यासाठी त्यांनी खोलवर तपास करत सिद्धीकीचा दावा खोडून काढला