मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण वाढणार असून, सोमवारी आणि मंगळवारी मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अतिमुसळधार पावसाचा तर ठाणे, रायगड, पालघर येथे अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, मुंबई शहरासाठी रविवारचा दिवस मात्र मध्यम पावसाचा होता.

राज्यभरातील बहुतेक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि त्याच वेळी गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीच्या भागात अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक भागांवर जाणवत आहे. पुढील दोन दिवसही मुसळधारांचा अंदाज असून ठाणे, रायगड, पालघर या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील काही भाग, मराठवाडय़ातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये, उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या

जिल्ह्यांमध्ये, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांच्या काही भागांत अतिमुसळधार पाऊस असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पाऊसमान

रविवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कुलाबा भागात ८ मिमी, वरळी (३७ मिमी), माझगाव (२२.४० मिमी), दादर (२७.८० मिमी), बांद्रा (२४.२० मिमी), सांताक्रूझ (३१.२० मिमी), अंधेरी (४४ मिमी),  कांदिवली (४५.६० मिमी), बोरिवली (५०.८० मिमी), चेंबूर (३९.२० मिमी), पवई (५८.२० मिमी), भांडूप (५२.४० मिमी), मुलुंड, पू. (७२.८० मिमी), मुलुंड प. (३४.२० मिमी), नेरुळ (३५.६० मिमी), पनवेल (४२.८० मिमी) अशी पावसाची नोंद करण्यात आली आहे.