25 February 2021

News Flash

महामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार

पेट्रोल पंप कर्मचारी, ढाब्यावरील कामगारांना प्रशिक्षण

पेट्रोल पंप कर्मचारी, ढाब्यावरील कामगारांना प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार देण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून एक वेगळी संकल्पना राबविण्यात येणार आहे. महामार्गालगतच्या गावातील ग्रामस्थ, पेट्रोल पंप आणि ढाब्यावर काम करणारे कर्मचारी आदींना प्रथमोपचार प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १८ जानेवारीपासून होणाऱ्या रस्ते सुरक्षा अभियानात या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

बेदरकारपणे किंवा मद्य पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे इत्यादी कारणांमुळे दरवर्षी महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होतात. यामध्ये अनेकांचे जीव जातात किंवा अनेक जण गंभीर जखमी होतात. अशा अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकाही उपलब्ध केली आहे. परंतु वाहतूक कोंडी किंवा अन्य कारणांमुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब झाल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे अपघातग्रस्तांना त्वरित प्रथमोपचार मिळून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी गावकरी, पेट्रोल पंप, पथकर नाके  व ढाब्यावरील कर्मचारी, दुकानदार यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अपघातातील जखमी व्यक्तीचा रक्तस्राव कसा थांबवावा, एखाद्या वाहनचालकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काय करावे, अशा प्रकारचे प्रशिक्षण महामार्गालगत असलेल्या गावकरी, स्थानिकांना देण्यात येणार आहे. गाव, तालुका येथे असलेल्या दवाखान्यांमधील किंवा सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांची प्रशिक्षण देण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. स्ट्रेचर, वैद्यकीय सुविधांसह प्रथमोपचार पेटीही पेट्रोल पंप, पथकरनाक्यांवर उपलब्ध करता येऊ शकते याचाही विचार केला जात आहे. सध्या राज्यात ६३ ठिकाणी महामार्ग पोलिसांचे मदत केंद्र असून या केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यांची मदत..

अपघातस्थळी त्वरित पोहोचून मदत मिळावी यासाठी आणखी काही सामाजिक संस्था, गिर्यारोहक, गावागावांतील मंडळे यांच्याशीही महामार्ग पोलिसांकडून संपर्क साधला जाणार आहे. सध्या अपघातात मदत करणाऱ्या काही संस्था, गिर्यारोहक आहेत, परंतु त्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे.

अपघातग्रस्त ठिकाणी रुग्णवाहिका, पोलीस पोहोचण्यापूर्वी जखमींवर कशा प्रकारे उपचार करावे, याचे प्रशिक्षण महामार्गालगत असलेल्या गावकरी, पथकर नाके , पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसह अन्य काही जणांना देण्यात येणार आहे. अपघातानंतर घाबरून न जाता रुग्णवाहिका, पोलीस यांना घटनास्थळी बोलाविण्यासाठी कसे प्रयत्न करावे, याचीही माहिती त्यांना देण्यात येईल.

– भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलीस महासंचालक, वाहतूक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 2:25 am

Web Title: immediate first aid to highway accident victims zws 70
Next Stories
1 ‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक
2 औरंगाबाद नामांतरावरून वाक् युद्ध
3 सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव – दरेकर
Just Now!
X