मालाड (प)  येथे एकटय़ाच रहात असलेल्या विकलांग विराली मोदी यांनी ट्विट केल्यावर मुंबई  पोलिसांनी घरी जाऊन तातडीने मदत केली आहे. करोनामुळे संचारबंदी लागू असल्याने एकटय़ा रहात असलेल्या विकलांग, ज्येष्ठ नागरिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

विराली मोदी या एकटय़ा रहात असून पोलिसांच्या र्निबधांमुळे त्यांच्याकडे काम करणारी महिला घरी येऊ शकत नव्हती. विराली मोदी यांनी ट्विटद्वारे आपली समस्या मांडली.

तेव्हा खासदार डॉ. भागवत कऱ्हाड यांनी तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणली. देशमुख यांनी सूचना दिल्यावर तातडीने चक्रे फिरली. पोलिस उपायुक्तांनी दूरध्वनी केला आणि निरीक्षक जॉर्ज फर्नांडिस आपल्या सहकाऱ्यांबरोबर विराली यांच्या घरी पोचले. त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेला पोचवून परवान्याचीही व्यवस्था करण्यात आली. माहिती मिळाल्यावर काही वेळातच पोलिसांकडून मदत मिळाल्याने विराली मोदी यांनी पोलिसांसह सर्वांचे आभार मानले आहेत. विकलांगांच्या मदतीसाठी त्या कार्य करतात.