मुंबईची पुढील काळातील विजेची गरज भागविण्यासाठी विक्रोळी येथे प्रस्तावित ४०० के.व्ही. जीआयएस उपकेंद्र प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करून २०२३ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. एक दशकापासून हा प्रकल्प रखडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारणा केल्यानंतर या प्रकल्पासाठीची जागा तातडीने अदानीला हस्तांतरित करण्याची ग्वाही टाटा पॉवर कंपनीने दिली.

मुंबईत नुकत्याच झालेल्या वीजपुरवठा खंडितप्रकरणी वर्षां निवासस्थानी विक्रोळी प्रकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या वेळी खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते. मुंबईला अखंडित वीजपुरवठय़ासाठी महत्त्वपूर्ण असा दशकभराआधी मान्यता मिळालेला हा प्रकल्प इतकी वर्षे रखडणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतील खासगी वीज कंपन्यांना सुनावले.

टाटा पॉवर कंपनीने पुढील आठवडय़ापर्यंत विक्रोळी प्रकल्प उभारणीसाठी जागा अदानी ट्रान्समिशन लि.ला हस्तांतरित करण्याचे मान्य केले आहे. जागेच्या ताब्यानंतर प्रकल्पाचे काम कोणत्याही स्थितीत २०२३ पर्यंत पूर्ण झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, अशी माहिती महापारेषणच्या व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी दिली. या प्रकल्पाच्या वाहिन्यांसाठी पाणथळ जागेत आणि डोंगरावर पारेषण मनोरे उभारण्याची गरज असल्याने वन विभागासह, भारतीय विमान वाहतूक प्राधिकरणाच्या परवानग्यांसाठी तातडीने पाठपुरावा करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विक्रोळी प्रकल्पामुळे सध्याच्या तुलनेत मुंबईसाठी १००० मेगावॉट अतिरिक्त वीज बाहेरून आणणे सोपे होईल. त्यासाठी खारघर उपकेंद्रातून ४०० केव्ही वीजवाहिनी उभारणे प्रस्तावित आहे. तसेच तळेगाव- कळवा ४०० केव्ही वीज वाहिनीवरून विक्रोळी पर्यंत ४०० केव्ही वीज वाहिनी तसेच पडघा, नवी मुंबई या ग्रीड उपकेंद्राशी जोडणी करणे आदी बाबी समाविष्ट आहे, अशी माहिती प्रधान सचिव गुप्ता यांनी दिली.

कळवा-तळेगाव पारेषण वाहिनी पूर्ववत

* महापारेषणची कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी पूर्ववत करण्यासाठी तब्बल १०० अभियंते आणि कर्मचारी दिवस-रात्र काम करत होते. धुके आणि सततच्या पावसातही काम करत कर्मचाऱ्यांनी अखेर वीजपुरवठा पूर्ववत केला.

* १० ऑक्टोबरला ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी कंडक्टर तुटल्यामुळे बाधित झाली होती. ४०० के. व्ही. कळवा उपकेंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या चारपैकी तीन वाहिन्यांवर कळवा उपकेंद्राचा संपूर्ण भार ४०० के. व्ही. तळेगाव (ढॅ)-खारघर तसेच ४०० के. व्ही. खारघर-कळवा या वाहिन्यावर येऊन खारघर उपकेंद्रात अति स्पार्किंगमुळे या वाहिन्या १२ ऑक्टोबरला तातडीने बंद करण्यात आल्या होत्या.

* महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी लोणावळा-कर्जतच्या घाटात प्रचंड धुके आणि सततच्या पावसातही त्यांनी काम सुरूच ठेवले आणि गुरुवारी रात्री ८ वाजता काम पूर्ण झाले.