अंधेरीत घरोघरी मूर्ती स्वीकारण्यासाठी गाडीची व्यवस्था

मुंबई: घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी अंधेरी परिसरात पालिकेच्या विभाग कार्यालयाने व्यवस्था केली आहे. विसर्जनासाठी भक्तांची गर्दी होऊ नये म्हणून गणेशमूर्ती स्वीकारण्यासाठी पालिकेच्या गाडय़ा परिसरात फिरणार आहेत. लोकांकडून मूर्ती स्वीकारून त्याचे विसर्जन पालिकेतर्फे केले जाणार आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना गणेशभक्तांना गणपतीच्या विसर्जनाची चिंता लागली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी यंदा अनेक बंधने घालण्यात आली आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचे विघ्न असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारी यंत्रणांमार्फत केले जात आहेत. पालिका प्रशासनाने सार्वजनिक आणि घरगुती गणपतींसाठी नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक मंडळांसाठी गणेश मूर्तींची उंची चार फूट तर घरगुती गणेशमूर्तीही दोन फुटापर्यंतच असावी असे बंधन घालण्यात आले आहे. तसेच घरगुती गणेशमूर्तीचे घरच्या घरी किंवा पुढच्या वर्षी विसर्जन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. काही मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव रद्द केला आहे.

यंदा घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी एका वेळी पाचपेक्षा जास्त भाविकांनी येऊ नये तसेच विसर्जनस्थळी आरती करू नये, अशी बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे ज्यांच्या घरी गणपती येतो, त्यांना मात्र घरच्या घरी विसर्जन कसे करायचे, गर्दी टाळण्यासाठी काय करायचे असे प्रश्न पडले आहेत. त्यामुळे पालिकेच्या विभाग कार्यालयांनीही आपापल्या स्तरावर भक्तांच्या सोयीसाठी उपाययोजना तयार केल्या आहेत. अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी पश्चिमेकडील गणेशभक्तांसाठी पालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयाने विसर्जनाची घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.

अंधेरीच्या के पश्चिम विभाग कार्यालयाची खास वाहने विसर्जनाच्या दिवशी विभागात आखून दिलेल्या मार्गावरून फिरणार आहेत. या ठिकाणी येऊन रहिवाशांना आपल्या मूर्ती देता येतील. तर ज्या ठिकाणी पालिकेचे वाहन पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी एखादे सार्वजनिक मंडळ नेमून दिले जाईल त्यांच्या मंडपात या मूर्ती ठेवता येतील. तेथून पालिकेच्या वाहनातून या मूर्ती विसर्जन स्थळी नेऊन त्यांचे विधिवत विसर्जन केले जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव

दरवर्षी मुंबईत ११ दिवसात तब्बल दोन ते अडीच लाख मूर्तींचे विसर्जन होते. या वर्षी हे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.  मुंबईत ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळे असून साधारण ३२ कृत्रिम तलाव पालिकेतर्फे तयार केले जातात. या वर्षी नैसर्गिक विसर्जन स्थळावरील, समुद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक विभागात मोठय़ा प्रमाणावर कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत.