प्रदेश काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मंगळवारी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत राज्यात मुस्लिम आरक्षण लागू करण्यमचा ठराव मंजूर करण्यात आला. केंद्राचे कृषी कायदे राज्यात लागू करण्यात येऊ नयेत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली.

राज्यातील सर्व समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध असणे, हा महाविकास आघाडीचा किमान समान कायक्र्रम असून मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करणे हा त्याचाच भाग असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून एक दिवस शेतक-यांसोबत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संकल्प अभियान राबविले जाणार आहे, त्यासाठी सहा महिन्यांचा कार्यक्रम अखिल भारतीय काँग्रेस समितीने दिला असल्याची माहिती प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली. राज्यात या वर्षांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इतर पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करुन घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

विकास मंडळनिहाय निधीचे वाटप व्हावे

विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या विकास मंडळांना अद्याप मुदतवाढ देण्यात आलेली नसली तरी आगामी अर्थसंकल्पात निधीचे वाटप करताना  विकास मंडळाच्या सूत्रानुसार मागास भागांच्या विकासासाठी निधीचे वाटप व्हावे, असा ठराव अशोक चव्हाण यांनी मांडला होता. भाजपने विकास मंडळांच्या मुद्यावर आक्र मक भूमिका घेतल्याने काँग्रेसला विकास मंडळानुसार निधीचे वाटप व्हावे, अशी मागणी करावी लागली.