महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जाती, जमाती व इतर वंचित-उपेक्षित वर्गासाठी कल्याणकारी योजना राबावाव्यात, अशा सूचना अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्या आहेत. या संदर्भात राज्याचे काँग्रेसचे प्रभारी एच.के . पाटील यांनी दिल्लीतून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचा सहकारी म्हणून, काँग्रेस पक्ष समाजातील दुर्बल घटक, विशेषत: दलित, आदिवासी, ओबीसी आणि इतर उपेक्षित लोकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. महाविकास आघाडी सरकारने वंचित-उपेक्षित वर्गासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्याची विनंती काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. कर्नाटक आणि अविभाजित आंध्र प्रदेश (मागील काँग्रेसच्या सरकारांनी बनविलेले कायदे) यांच्या धर्तीवर अनुसूचित जाती व जमातीसाठी अर्थसंकल्पातील निधीचे संरक्षण करण्यासाठी कायदा करण्याची सूचना केली आहे.

सूचना काय?

* राज्यातील शासकीय नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती व जमातीचा अनुशेष विशेष भरती मोहीम राबवून भरून काढावा.

* सरकारी कंत्राटांमध्ये आरक्षण असावे, या समाजातील मुला-मुलींसाठी शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास महत्त्वपूर्ण आहे, त्यास सर्वोच्च प्राधान्य मिळावे.

* शिष्यवृत्ती योजना, वसतिगृहाच्या सुविधा, विशेषत: निवासी शाळांचा विस्तार करणे आवश्यक आहे.