अंधेरी पश्चिम येथे पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी राखीव ठेवण्यात आलेले भूखंड कोकिळाबेन अंबानी रुग्णालय, सनदी अधिकाऱ्यांच्या पाटलीपुत्र सोसायटीपाठोपाठ ‘आकृती बिल्डर्स’ला वितरीत करण्यात आल्यानंतर अतिरिक्त पाच हजार चौरस मीटर भूखंड कुंपण घालून याच बिल्डर्सने आपल्या ताब्यात घेतल्याची बाब उघड झाली आहे. महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अरूप पटनाईक यांनी उच्च न्यायालयात केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
‘लोकसत्ता’ने ३ ऑगस्ट रोजी ‘आकृती बिल्डर्ससाठी सरकारी पायघडय़ा’ या मथळ्याखाली याबाबतचे प्रसिद्ध केले होते. त्यावेळी स्पष्टीकरण देताना आकृती बिल्डर्सचे अध्यक्ष विमल शाह यांनी, हा ‘मनोरंजन भूखंड’ आपल्याला दिलेला नाही. मात्र महापालिकेच्या विकास प्रस्ताव आराखडय़ातच मुद्रण कामगार नगर भूखंडासोबत तो दाखविण्यात आलेला आहे. त्यामुळे तो वेगळा वितरीत करण्याची आवश्यकता नाही, असा दावा केला होता. मात्र पटनाईक यांच्या प्रतिज्ञापत्रात ‘आकृती बिल्डर्स’ने १९ हजार २०० चौरस मीटर भूखंडावर कुंपण घातल्याचे नमूद केल्यामुळे प्रत्यक्षात १४ हजार २७० चौरस मीटर भूखंड वितरीत झालेला असतानाही अतिरिक्त पाच हजार चौरस मीटर भूखंड ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.
अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथील २२ एकर भूखंड १९६२ मध्ये मुद्रण कामगार वसाहतीसाठी उपलब्ध करून दिला होता. यापैकी विविध भूखंडाचे सनदी अधिकाऱ्यांच्या सोसायटय़ा, अंबानी रुग्णालय, शाळा आदींना वितरण करून शिल्लक राहिलेल्या साडेचार एकर जागेवर मुद्रण कामगारांसाठी १३ इमारती बांधण्यात आल्या. आता या इमारतीही पाडून तेथे ‘उद्योग भवन’ बांधण्याचे शासनाने ठरविले आहे. सुमारे १४ हजार २७० चौरस मीटर इतका भूखंड प्रति चौरस मीटर एक रुपया दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्टय़ाने वितरीत करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात १९ हजार चौरस मीटर भूखंडावर आकृती बिल्डर्सने कुंपण घातल्याची बाब उघड झाल्यानंतरही उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय ढिम्म आहे.