महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळाले असले तरी सारी महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला आली आहेत. यावरून सरकारमध्ये राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहणार असून, याचेच शल्य काँग्रेसला आहे.

गृह, वित्त, जलसंपदा, ग्रामीण विकास, सहकार, गृहनिर्माण, अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, समाजकल्याण ही सारीच महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आली. खातेवाटपाची चर्चा सुरू झाली तेव्हाच राष्ट्रवादीने सारी महत्त्वाची खाती आपल्याला मिळतील याची खबरदारी घेतली होती.  राष्ट्रवादीने खातेवाटपात ज्येष्ठ नेत्यांना सूचक इशारा दिला. गृह खात्यावर साऱ्याच नेत्यांचे लक्ष होते. अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांना डावलून अनिल देशमुख यांच्याकडे गृह हे सर्वात महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. २००४ मध्ये आर. आर. पाटील यांच्याकडे गृह खाते सोपविण्यात आले होते व त्याचा राष्ट्रवादीला राज्यात फायदाही झाला होता. अनिल देशमुख हे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. अजित पवार यांच्या निकटवर्तीयाला गृह खाते देण्यात आलेले नाही याकडे लक्ष वेधण्यात येते. अजित पवार यांच्या बंडानंतर अजितदादांच्या विरोधात घोषणाबाजीत पुढाकार घेणारे जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण हे महत्त्वाचे खाते मिळाले. यावरून आव्हाड यांच्या पक्षनिष्ठेला नेतृत्वाने बळच दिल्याचे स्पष्ट होते.

छगन भुजबळ यांचा पहिल्याच टप्प्यात मंत्रिमंडळात समावेश करून त्यांच्या ज्येष्ठतेचा सन्मान राखला. आधी जलसंपदा खाते त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते, पण दुसऱ्या दिवशी हे खाते काढून घेण्यात आले. अन्न व नागरी पुरवठा हे खाते त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सहकार हा राष्ट्रवादीचा पाया मानला जातो. हे खाते प्रथमच राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आले. आघाडी सरकारमध्ये  हे खाते काँग्रेसने स्वत:कडे ठेवले होते.