पदपथ, रस्ते दुरुस्ती, सुशोभीकरणाबाबत चार दिवसांत अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

महत्त्वाचे रस्ते फेरीवाला, अतिक्रमण, कचरा-राडारोडामुक्त करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी सोमवारी उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि खातेप्रमुखांना दिले. त्याचबरोबर गरजेनुसार रस्ते आणि पदपथांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल २७ डिसेंबरच्या बैठकीत सादर करावा लागणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईला एक महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे विदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने मुंबईला भेट देण्यासाठी येत असतात. तसेच मुख्यमंत्री आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या जाण्या-येण्याचे मार्ग निश्चित आहेत. अनुक्रमे पर्यटनस्थळे आणि महत्त्वाचे मार्ग सुस्थितीत असावेत या दृष्टिकोनातून विभाग कार्यालयांच्या हद्दीतील किमान दोन रस्त्यांची निवड करून त्यांची आवश्यक ती दुरुस्ती करावी. आवश्यकतेनुसार रस्ते आणि पदपथांवर रंगरंगोटी करावी. तसेच निवडलेल्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांना हटवावे, रस्ते कचरा-राडारोडामुक्त करावे, असे आदेश पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सोमवारी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिले.

पदपथ सुंदर दिसावेत असे बदल २६ डिसेंबपर्यंत करून त्याचा अहवाल २७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात होणाऱ्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी २४ विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना दिले. या बैठकीस पालिका उपायुक्त आणि काही साहाय्यक आयुक्त उपस्थित होते. काही विभाग कार्यालयांचे साहाय्यक आयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. रस्ते, पदपथांवरील झोपडय़ा, अतिक्रमणे, बेकायदा जाहिरातीचे फलक हटविण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याची तयारी पोलीस आयुक्तांनी दर्शविली आहे. त्यामुळे विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्तांनी संबंधित पोलीस उपायुक्त व प्रभाग समिती अध्यक्ष यांच्याशी बैठक घेऊन पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घेण्याचे आदेश प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

रस्ते – पदपथांची दुरुस्ती कशी करावी, कोणत्या प्रकारचे नामफलक लावावे, रंगकाम कसे करावे याचा आराखडय़ात समावेश करावा. लागणारा निधी प्रमुख लेखापाल (वित्त) उपलब्ध करतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. येत्या २७ डिसेंबर रोजी या संदर्भातील अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे रस्त्यांची निवड करून सुशोभीकरण करण्यासाठी साहाय्यक आयुक्तांची धावपळ उडाली आहे.

पदपथ सुधारणेसाठी आराखडा

झोपडय़ा, अतिक्रमणे, कचऱ्याचे ढीग, राडारोडा यामुळे आलेले बकाल रूप बदलण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये पदपथांची सुधारणा करण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. यासाठी सल्लागारांची मदत घेऊन पदपथ व रस्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा, असेही साहाय्यक आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत.

* विभाग कार्यालयांच्या हद्दीतील किमान दोन रस्त्यांची दुरुस्ती करावी.

* आवश्यकतेनुसार रस्ते आणि पदपथांवर रंगरंगोटी करावी.

* निवडलेल्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांना हटवावे.

* रस्ते कचरा-राडारोडामुक्त करावे.